दहावीला मराठी विषयात ३८ हजार विद्यार्थी नापास; इंग्रजी पेक्षा मातृभाषेत जास्त नापास

इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सहा पटीने जास्त आहे. राज्यातील 6738 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले आहेत तर 38 हजार 437 विद्यार्थी मराठी या मातृभाषा असलेल्या विषयात नापास झाले आहेत.

दहावीला मराठी विषयात ३८ हजार विद्यार्थी नापास; इंग्रजी पेक्षा मातृभाषेत जास्त नापास

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (New National Education Policy) मातृभाषेतील शिक्षणावर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे. मात्र सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालातून (10th result 2024) धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी विषयातच हजारो विद्यार्थी  (Students fail in mother tongue Marathi subject) नापास झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सहा पटीने जास्त आहे. राज्यातील 6 हजार 738 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले आहेत तर 38 हजार 437 विद्यार्थी मराठी (38 thousand 437 students failed in Marathi) या मातृभाषा असलेल्या विषयात नापास झाले आहेत.

ज्या राज्याची मातृभाषा मराठी आहे, अशा राज्यामध्येच दहावीच्या मुलांना इंग्रजीपेक्षा मराठी अधिक कठीण जात असल्याचे दिसत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या विषयातच गटांगळ्या खाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबई विभागात मराठी विषयात नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 4 हजार 670 एवंडही आहे. दहावीची परीक्षा ही 58 विषयांसाठी घेण्यात आली होती. त्यातील 21 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. यामध्ये गुजराती, द्वितीय भाषा उर्दू, हिंदी-फ्रेंच द्वितीय आणि तृतीय भाषा, हिंदी कन्नड, हिंदी-तामिळ, हिंदी- मल्याळम, हिंदी-बंगाली आदी विषयांचाही निकाल 100 टक्के लागला आहे. 

महाराष्ट्रामध्ये एकूण 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली. त्यापैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 38 हजार 437 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत. मुंबई विभागामध्ये मराठी विषयाची परीक्षा देणाऱ्यांची संख्या 1 लाख 6 हजार 256 इतकी होती. मात्र, प्रत्यक्ष परीक्षेला 1 लाख 5 हजार 322 जण हजर होते. त्यापैकी 1 लाख 652 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच मुंबई विभागात नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 4 हजार 670 इतकी आहे.  

दुसरीकडे इंग्रजी भाषेसंदर्भातील आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसते की इंग्रजी विषयाचा निकाल 98.12 टक्के इतका लागला. 3 लाख 59 हजार 229 विद्यार्थ्यांनी इंग्रजी (पहिली भाषा) परीक्षा दिली. त्यापैकी 3 लाख 52 हजार 491 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.