मोठी बातमी : जी.जी.इंटरनॅशनल, संस्कार, एलिट,पेरीविन्कल शाळा अनधिकृत; दंड व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश  

  पिरंगुट येथील एलिट,पेरीविन्कल आणि संस्कार प्रायमरी स्कूल आणि बावधन बुद्रुक येथील जीजी इंटरनॅशनल स्कूल या शाळांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड केला असून दंडाची रक्कम सात दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

मोठी बातमी : जी.जी.इंटरनॅशनल, संस्कार, एलिट,पेरीविन्कल शाळा अनधिकृत; दंड व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क /पुणे 

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने अनधिकृत शाळा (unauthorised School) बंद करण्याचा धडाका लावला असून शहरातील अनधिकृत शाळांवर  एक लाख रुपये  दंड आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई जोमात सुरू केली आहे. मुळशी तालुक्यातील सहा शाळांवर मोठी कारवाई झाली आहे. मात्र, या शाळा बंद होणार असल्याने हजारो पालकांवर दुसऱ्या शाळा शोधण्याची वेळ येणार आहे. अनधिकृत शाळांमध्ये जी.जी. इंटरनॅशनल स्कूल  (GG International School ),संस्कार प्रायमरी स्कूल (Sanskar Primary School ), एलिट इंटरनॅशनल स्कूल (Elite International School) पेरीविन्कल इंग्लिश मीडियम स्कूल  (Periwinkle English Medium School) आदी शाळांचा समावेश आहे.   

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/                      

         शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मान्यतेची आवश्यकता आहे. तसेच शाळांनी ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. परंतु शाळांकडे आवश्यक कागदपत्र नसल्याने शिक्षण विभागाने संबंधित शाळांवर कारवाईचा धडाका लावला आहे. त्यात आता शहरातील नामांकित शाळा सुद्धा शिक्षण विभागाच्या रडारवर आल्याचे दिसून येत आहे. त्यात बावधान बुद्रुक येथील जी.जी. इंटरनॅशनल स्कूल आणि एस. एन. बी. बी. इंटरनॅशनल स्कूल तर पिरंगुट येथील संस्कार प्रायमरी स्कूल, एलिट इंटरनॅशनल स्कूल आणि पेरीविन्कल इंग्लिश मीडियम स्कूल, नेरे दत्तवाडी येथील साई बालाजी पब्लिक स्कूल या शाळांचा समावेश आहे.

        पिरंगुट येथील एलिट,पेरीविन्कल आणि संस्कार प्रायमरी स्कूल आणि बावधन बुद्रुक येथील जी. जी इंटरनॅशनल स्कूल या शाळांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड केला असून दंडाची रक्कम सात दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या पुढील काळातही शाळा सुरू राहिल्यास प्रतिदिनी १० हजार रुपये दंड केला जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

येरवडा येथील शुभद्राज डी. के. एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या मार्फत मुळशी तालुक्यातील बावधन बुद्रुक येथे एस. एन. बी. बी. इंटरनॅशनल स्कूल या नावाने अनधिकृत शाळा सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळेला शासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे संबंधित शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरेगाव पार्क येथील साई बालाजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत मुळशी तालुक्यात दत्तवाडी नेरे या ठिकाणी साई बालाजी पब्लिक स्कूल अनधिकृत रित्या सुरू असून शासनाला अद्याप शाळा सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही.त्यामुळे या शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी दिले आहेत.

----------------------

शिक्षण विभागाच्या कारवाईमुळे अनधिकृत शाळा बंद होणार असल्या तरी त्याचा फटका पालक आणि विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण या शाळांमधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे.शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शहरातील हजारो विद्यार्थ्यांना आता नवीन आपल्या घराजवळील शाळा शोधाव्या लागणार आहेत .