महापारेषण पदभरती प्रक्रिया रद्द ; उमेदवारांमध्ये संतापाची लाट 

महापारेषण पदभरती प्रक्रिया रद्द ; उमेदवारांमध्ये संतापाची लाट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सरकारने मराठा समाजाला लागू केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी (Implementation of Maratha Reservation) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) विविध पदांची भरती प्रक्रिया रद्द (Mahapareshan recruitment process cancelled) केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण २ हजार ५४१ पदांच्या भरतीसाठी भरती २०२३ जाहीर झाली. त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले असताना अंतिम टप्प्यात ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याच्या संतप्त प्रतिक्रिया (Students react angrily) येत आहेत.  

भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना महापारेषण कडून वर्ष २०२३ आणि २०२४ मधील सर्व पदभरती प्रक्रिया अचानक रद्द करण्यात आली. महापारेषण कंपनीकडून त्याबाबत त्यांच्या संकेतस्थळावर याबाबत सूचना प्रसारित केली आहे. सूचनेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी, आरक्षणाच्या स्थितीची पुनर्गणना करणे आवश्यक आहे. त्यामुळे या जाहिरातींवरील पदांसाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले गेले. आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही कंपनीचे स्पष्ट केले आहे . 

अशा अचानक भरती रद्द होण्याच्या बातमीनंतर संतप्त उमेदवारांनी राज्याचे ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत ही परीक्षा रद्द न करता पूर्ववत करण्याची मागणी केली गेली. तसेच बीई., बी.टेक साठी असलेल्या या पदाच्या भरतीची अंतिम निवड यादी ही कुठल्याच प्रकारचे अतिरिक्त गुण न देता आयबीपीएस परीक्षेच्या गुणानुसारच घेण्याची मागणीही काही उमेदवारांकडून केली गेली. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेणार? यावर काही तोडगा काढला जाणार का? तोडगा काढलाच तर तो काय असेल, असा सवाल उपस्थित होत आहे. अर्ज भरलेल्या संपूर्ण उमेदवारांचे लक्ष आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.