शिक्षक भरतीसाठी माजी सैनिक आणि भूकंपग्रस्तांच्या रिक्त जागा केल्या रूपांतरित

शासनाने दिनांक ७ जूनच्या पत्राने माजी सैनिक या समांतर आरक्षणातील माजी सैनिक यांचेसाठी जाहिरातीतील जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून भरण्यासाठी मान्यता दिली.

शिक्षक भरतीसाठी माजी सैनिक आणि भूकंपग्रस्तांच्या रिक्त जागा केल्या रूपांतरित
Teacher recruitment


एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (State School Education Departments) पवित्र पोर्टलच्या (Pavitra Porta)माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया (Teacher recruitment process)राबवली जात असून माजी सैनिक व भूकंपग्रस्त (ex-servicemen earthquake victims)या समांतर आरक्षणातील रिक्त जागा (Vacancy in parallel reservation)त्या त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून काही घटकांकडून अभियोग्यताधारकांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र ही बाब योग्य नाही.शिक्षण विभागाकडून बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी,असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. 

शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या बुलेटीननुसार  शासनाने दिनांक ७ जूनच्या पत्राने माजी सैनिक या समांतर आरक्षणातील माजी सैनिक यांचेसाठी जाहिरातीतील जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून भरण्यासाठी मान्यता दिली. त्या पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार संबंधित सक्षम अधिकारी यांच्या कार्यालयास १० जून रोजी प्रस्ताव देण्यात आला.  तसेच  १४ जूनपर्यंत पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावाही करण्यात आला. संबंधित विभागाने देखील त्यांच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाकडून माजी सैनिक व शहीद सैनिकांचे वारस यांचेतून शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या माजी सैनिक या समांतर आरक्षणास पात्र असणाऱ्या उमेदवारांची माहिती मागविलेली आहे.

शासनाने दिनांक १४ जूनच्या पत्राने त्या त्या सामाजिक प्रवर्गाअंतर्गत भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गुणवत्तेनुसार आरक्षण व विषयनिहाय पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत, याबाबत पुनश्च खात्री करून सदर रिक्त जागांपैकी १० टक्के जागा राखून उर्वरित प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून व तदनंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश आहेत.त्यानुसार आयुक्तालय स्तरावरील अंतर्गत कार्यवाही सुरू आहे. 

दोन्ही प्रवर्गांच्या समांतर आरक्षणाच्या संदर्भात काही अटींची पूर्तता केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश असल्याने ती कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित रिक्त पदांसाठी व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या याद्यांसंदर्भात कोणताही कायदेशीर विवाद निर्माण होऊ नये यासाठी शासन आदेशामधील अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.

 दिनांक ७ जून व दिनांक १४ जून रोजी आदेश प्राप्त झाल्यानंतर दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच याद्या प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने पोर्टल वरील आवश्यक तांत्रिक चाचणी देखील सोबत करण्यात येत आहे.वरील अटींची पूर्तता तसेच या संदर्भातील विविध परस्पर विरोधी मागण्या या सर्वांसंदर्भात सुयोग्य कार्यवाही प्रशासकीय स्तरावरून केली जात असतानाही या गुणवत्ता यादी संदर्भात काही घटकांकडून अभियोग्यताधारकांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.ही बाब योग्य नाही.बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी,असे शिक्षण विभागातर्फे बुलेटीनाद्वारे स्पष्ट केले आहे.