गैरप्रकारामुळे महाज्योतीची UPSC प्रवेश परीक्षा अखेर रद्द ; पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय

अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत गैरप्रकार झाल्यामुळे पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी महाज्योतीकडे केली आहे. त्यामुळे यूपीएससी प्रशिक्षणासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

गैरप्रकारामुळे महाज्योतीची UPSC प्रवेश परीक्षा अखेर रद्द ; पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (Mahajyoti) संस्थेतर्फे (महाज्योती)  यूपीएससी (UPSC) पूर्व प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेत गैरप्रकार झाल्याने १६ जुलै 2023 रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात येणार असल्याचे महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाला शिरसाठे (kunal  shirsathe) यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : स्पर्धा परीक्षा ‘महाज्योती’च्या परीक्षेतही गैरप्रकार; उमेदवारांच्या तक्रारींनंतर चौकशी सुरू

महाज्योती मार्फत विविध प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निवडण्याकरता  निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.  निविदा प्रक्रियेतून निवडण्यात आलेल्या एजन्सीकडे १६ जुलै रोजी यूपीएससी पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली होती. या परीक्षेस २० हजार २१८ उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील १३ हजार १८४ उमेदवारांनी राज्यातील १०२ परीक्षा केंद्रांवर तर दिल्ली येथील २ परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. परंतु,परीक्षा झाल्यानंतर काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयाकडे प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारीनुसार महाज्योती कार्यालयातर्फे मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.

चौकशी अधिकाऱ्यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागितला. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने गैरप्रकाराची चौकशी करून पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याची विनंती महाज्योती संस्थेला केली आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा गैरप्रकार झाल्यामुळे पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी महाज्योतीकडे केली आहे. त्यामुळे यूपीएससी प्रशिक्षणासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.तसेच  परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना विद्यार्थी आढळून आल्यास अशा विद्यार्थ्यांवर जागेवरच कायदेशीर कार्यवाही करावी, अशा सक्त सूचना महाज्योती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला दिल्या आहेत.