MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; शासकीय वसतिगृहातील घटना

विजय तुकाराम नांगरे (वय २१, रा. सामाजिक न्याय वसतीगृह, विश्रांतवाडी, मूळ गाव परभणी) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्येनंतर विश्रांतवाडी पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळली आहे.

MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; शासकीय वसतिगृहातील घटना
Vijay Nangare

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यामध्ये विद्यार्थी आत्महत्येचे (Suicide) सत्र या आठवड्यातही सुरूच आहे. मागील आठवड्यात विधी शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होता. सोमवारी आणखी एका विद्यार्थ्याने (Student) गळफास घेत आपले जीवन संपले. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलिसांना (Pune Police) प्राथमिक तपासात आढळून आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या (Social Justice Department) वसितगृहातील खोलीतच त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

विजय तुकाराम नांगरे (Vijay Nangare) (वय २१, रा. सामाजिक न्याय वसतीगृह, विश्रांतवाडी, मूळ गाव परभणी) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्येनंतर विश्रांतवाडी पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळली आहे. त्यामध्ये विजयने आत्महत्येचे कारण लिहिले आहे. 'मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. मी मुलगा म्हणून, भाऊ म्हणून काही करू शकलो नाही,' असे विजयने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात बी. ए. च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचीही तयारी करत होता. विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात तो राहत होता. सोमवारी सकाळी वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरील अभ्यासिकेतील पंख्याला गळफास लावून घेत विजयने आपले जीवन संपवले.

विजयने गळफास घेतल्याचे लक्षात येताच वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. सुसाईड नोटमधून मजकुरानुसार विजयने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, विजयने यापुर्वीही दोन-तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे पोलिसांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2