MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल

परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org वर विद्यार्थ्यांना पाहता येईल.

MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल
MHT CET 2023 Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलकडून घेण्यात आलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल जाहीर करण्यात आला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) या दोन्ही गटात प्रत्येकी १४ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाईल मिळवले आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही परीक्षा अनिवार्य असते.

परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org वर विद्यार्थ्यांना पाहता येईल. परीक्षेसाठी एकूण ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी पीसीएम (PCM) तर २ लाख ७७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी पीसीबी गटासाठी नोंदणी केली होती. ही परीक्षा अनुक्रमे ९ ते १३ मे आणि १५ मे ते २० मे दरम्यान घेण्यात आली.

नोंदणीकृत उमेदवारांपैकी पात्र ५ लाख ९१ हजार १३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९२.९३ टक्के इतकी होती. एमएचटी सीईटी परीक्षेत राज्यातील एकूण २८ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. मागीलवर्षी परीक्षेसाठी एकूण ६ लाख ४ हजार ७८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.