एम. फक्टोची निवडणूक बिनविरोध ; अध्यक्षपदी पुन्हा डॉ. एस. पी. लवांडे

एम.फक्टोची स्थापना 19 74 साली झाली असून गेली पन्नास वर्ष उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत महाविद्यालयीन व विद्यापीठ प्राध्यापक यांचे प्रश्न आणि उच्च शिक्षणाच्या हितरक्षणासाठी काम करीत आहे.

एम. फक्टोची निवडणूक बिनविरोध ; अध्यक्षपदी पुन्हा डॉ. एस. पी. लवांडे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाच्या (एम. फक्टो.) (Maharashtra Federation of University and College Teacher Organisation -MFUCTO) अध्यक्षपदी प्रा. डॉ. एस. पी. लवांडे (S P Lawande)व सरचिटणीसपदी प्रा. डॉ.पी.बी. रघुवंशी (Dr. P.B. Raghuvanshi) यांची पुनः बिनविरोध निवड झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवारी पार पडलेल्या एम. फक्टो .च्या  सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

एम. फक्टो.च्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एस.पी.लवांडे , सरचिटणीस पदी अमरावती विद्यापीठाचे पी.बी. रघुवंशी , सहसचिव पदी कोल्हापूर विद्यापीठाचे आर. के. चव्हाण व नांदेड विद्यापीठाचे डी. एन. मोरे व खजिनदारपदी मुंबई येथील एस.एन.डी.टी.विद्यापीठाचे प्रा. वसंत पानसरे यांची सर्वसंमतीने बिनविरोध निवड झाली,असे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेचे अध्यक्ष व एम. फक्टो. चे उपाध्यक्ष डॉ. के. एल. गिरमकर यांनी सांगितले. 

एम.फक्टोची स्थापना 19 74 साली झाली असून गेली पन्नास वर्ष उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत महाविद्यालयीन व विद्यापीठ प्राध्यापक यांचे प्रश्न आणि उच्च शिक्षणाच्या हितरक्षणासाठी काम करीत आहे. एम फक्टो कार्यकारी मंडळाने ठरविल्याप्रमाणे उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची अवहेलना, विद्यापीठ अनुदान आयोग रेग्युलेशनची अवहेलना, प्राध्यापक भरती, एम फिल पदवी प्राप्त प्राध्यापकांचा छळ, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही तक्रार निवारक यंत्रणेची अंमलबजावणी नाही, सर्वांना जुनी पेन्शन योजना इत्यादी मागण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये सुरू असलेले आंदोलन जोरकसपणे  करण्याचे आवाहन सर्वांना यावेळी करण्यात आले.