रॅप सॉंग प्रकरणी अजितदादांचे थेट मुख्यमंत्री शिंदे, फडणवीसांना पत्र

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसह आवारात बेकायदेशीरपणे रॅप साँग बनविल्याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रॅप सॉंग प्रकरणी अजितदादांचे थेट मुख्यमंत्री शिंदे, फडणवीसांना पत्र
Opposition Leader Ajit Pawar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) रॅप साँग प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणात लक्ष घालत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पत्र लिहिले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असला तरी शासन स्तरावरूनही याची दखल घ्यावी, अशी मागणी पवारांनी केली आहे. (Pune University Rap Song News)

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसह आवारात बेकायदेशीरपणे रॅप साँग बनविल्याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विद्यापीठाने स्वतंत्र चौकशी समितीही नेमली आहे. या प्रकरणावरून विद्यापीठ प्रशासनावर बरीच टीका झाली. रॅप सॉंगमध्ये शिव्यांचा भडिमार, दारुची बाटली, तलवार आणि पिस्तुलही दाखविण्यात आले आहे. त्यावरून सर्व स्तरातून टीका होत आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

अजित पवारांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आणि विद्यापीठ वास्तुला फार मोठा इतिहास आहे. अशा या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत, अधिसभा भरते त्या ठिकाणी, अश्लील भाषेतील रॅप साँगचे शूटिंग केले गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून समोरच्या टेबलवर दारुची बाटली आणि शस्त्र ठेऊन रॅपरने रॅप साँग चित्रीत केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : UGC कडून आमदार अमरीश पटेल यांना दणका; विद्यापीठाबाबत मोठा निर्णय

हा सर्व प्रकार अत्यंत निंदनीय असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारा आहे. या संदर्भात चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची तसेच विद्यापीठाने एक चौकशी समितीही नियुक्त केल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, या घटनेची शासन स्तरावरुन सुध्दा दखल घेण्याची आवश्यकता आहे, असे पत्रात नमूद केले आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे राज्यातील जनतेत प्रचंड संतापाची भावना आहे. पोलीस तपास आणि चौकशी समितीचा अहवाल तातडीने प्राप्त करून घेऊन संबंधित दोषींविरुध्द कारवाई करण्याबाबत शासनस्तरावरुन सुध्दा आदेश देण्यात यावेत. तसेच, भविष्यात असा प्रकार कोणत्याही विद्यापीठात वा शिक्षण संकुलात होणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना शासनामार्फत निर्गमित करण्यात याव्यात, अशी मागणी पवारांनी पत्राव्दारे केली आहे.