शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी 'या' ठिकाणांना देतात सर्वाधिक प्राधान्य

शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये जगातील विविध देशांमध्ये सुमारे १० लाख ३० हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत होते. तेथील प्रसिध्द विद्यापीठे, अभ्यासक्रमांमधील लवचिकता, संशोधनात मिळणारी संधी, इंटर्नशिप आणि करिअरच्या संधींमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जाते.

शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी 'या' ठिकाणांना देतात सर्वाधिक प्राधान्य

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

लाखो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी (Higher Education) परदेशात जाण्याला पसंती देतात. २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत १० लाखांहून अधिक विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी (Education in Abroad) गेल्याचे माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून (Ministry of External Affairs) देण्यात आली आहे. या माहितीनुसार, भारतातील (India) विद्यार्थी जगातील ७९ देशांध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य अमेरिका, कॅनडा, संयुक्त अरब अमराती, ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबिया या देशांना मिळत असल्याचे माहितीवरून समोर आले आहे.

 

शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये जगातील विविध देशांमध्ये सुमारे १० लाख ३० हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत होते. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी महिनाभरापुर्वी एका प्रश्नावर राज्यसभेत ही माहिती दिली होती.

अमेरिका : परदेशी शिक्षणात सर्वाधिक प्राधान्य अमेरिकेला दिले जात आहे. तेथील प्रसिध्द विद्यापीठे, अभ्यासक्रमांमधील लवचिकता, संशोधनात मिळणारी संधी, इंटर्नशिप आणि करिअरच्या संधींमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जाते.

नापास विद्यार्थ्यांना विद्यापीठाची 'लॉटरी'; सर्वांनाच परीक्षेची एक संधी 

कॅनडा : अमेरिकेच्या शेजारील कॅनडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनडातील विद्यापीठांमध्ये पदवी मिळविलेल्या पदवीधारकांना कायमस्वरुपी रहिवासी तेथील काही भागात सवलती दिल्या जातात. भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडामध्ये फारशा अडथळ्यांशिवाय मिळणारा प्रवेशही पसंती मिळण्यामागचे कारण आहे. येथील विद्यापीठांमधील मिळणाऱ्या पदव्यांनाही जगभरात मान्यता आहे. तेथील शिक्षणाचा खर्चही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.

 

संयुक्त अरब अमराती : संयुक्त अरब अमरातीमध्ये शिक्षणासाठी भारताप्रमाणेच जगभरातील विद्यार्थी पसंती देतात. बिझनेस हबमुळे भारतीय विद्यार्थी आकर्षित होतात. दळणवळणाच्या चांगल्या सुविधा आणि सुरक्षितताही एक कारण आहे. कामगार कायद्यांमध्ये लवचिकता असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच नोकरीही करता येते. अनेक शैक्षणिक संधी उपलब्ध असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना हा देश आकर्षित करतो.

 

ऑस्ट्रेलिया : जागतिक दर्जाची शिक्षण पध्दत, अव्वल विद्यापीठे, तेथील संस्कृती आणि शिक्षणानंतर मिळणाऱ्या नोकरीच्या संधीमुळे ऑस्ट्रेलियाही विद्यार्थ्यांच्या पसंतीचे प्रमुख ठिकाण बनले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित कररण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडूनही विविध शिष्यवृत्ती योजना आणि आर्थिक मदत केली जाते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी कडक कायदाही आहे.

 

सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील सार्वजनिक विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. संशोधनासाठीचा मुबलक निधी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्या, विद्यापीठांचे जागतिक क्रमावारीत वरचे स्थान आणि सुविधायुक्त प्रयोगशाळा, ग्रंथालये, हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. प्रवेश आणि नोंदणीसाठी सर्वप्रकारे मदत केली जाते. त्याचप्रमाणे राहण्याची सोय तसेच वाहतूक व्यवस्थेसह सर्व प्रकारच्या गरजांसाठी मदत पुरविली जाते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j