सीएचबी प्राध्यापकांना स्टॅम्प पेपरवर काय लिहून द्यावे लागणार ?

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केवळ कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली शासकीय कला महाविद्यालयांमधील सीएचबी प्राध्यापकांच्या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला आहे.अद्याप उच्च शिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील महाविद्यालयांबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध झालेला नाही.

सीएचबी प्राध्यापकांना स्टॅम्प पेपरवर काय लिहून द्यावे लागणार ?

राहुल शिंदे / प्रतिनिधी / एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 राज्याच्या कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांमधील सीएचबी प्राध्यापकांच्या (CHB professor)मानधन वाढीचा अध्यादेश (GR)प्रसिद्ध झाला असून पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या लेक्चरसाठी आता ९०० रुपये तास या दराने मानधन दिले जाणार आहे. मात्र या प्राध्यापकांना (professor) महाविद्यालयात (college) रुजू होण्यापूर्वी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर काही गोष्टी लिहून द्याव्या लागणार आहेत." भविष्यात सेवेत कायम करण्याची मागणी करता येणार नाही. तसेच नियमित सेवेच्या कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही" असे हमीपत्र प्राध्यापकांकडून रुजू होण्यापूर्वी लिहून घेतले जाणार आहे.    ‌                

 राज्यात विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे महाविद्यालयांना शैक्षणिक कामकाज करणे अवघड जात आहे. शासनाकडून ही पदे भरली जात नाहीत. एका पूर्णवेळ पदाच्या बदल्यात दोन सीएसबी पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. परंतु तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन फारच कमी असल्याने त्यात वाढ व्हावी, अशी मागणी विविध प्राध्यापक संघटनांकडून केली जात होती. अखेर प्राध्यापकांच्या मागणीला यश प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने सोमवारी या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला असून व्याख्यानासाठी ९०० रुपये तर प्रात्यक्षिकासाठी ७५० रुपये मानधन वाढविण्यात आले आहे. येत्या १ एप्रिल पासून सुधारित दर लागू केले जाणार आहेत.                      

  सेवानिवृत्त अध्यापक किंवा संबंधित अभ्यासक्रमाचे निगडित व्यवसायातील तज्ञ व्यक्ती यांना तासिका तत्वावरील अध्यापनासाठी निमंत्रित करण्यात यावे, कोणत्याही स्थितीत "बॅक डोअर नियुक्ती" परिस्थिती उद्भवेल अशा उमेदवारांना या प्रयोजनासाठी निमंत्रित करण्यात येऊ नये, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. सीएचबी तत्वावरील अध्यापकांची एका शैक्षणिक वर्षासाठी किंवा जास्तीत जास्त नऊ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करता येणार आहे. ही नियुक्ती कला संचालनालयाची मान्यता घेऊन करावी लागेल. नऊ महिन्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर ती नियुक्ती आपोआप संपुष्टात येणार आहे. प्रत्यक्ष उपलब्ध कार्यभार आणि तासिका तत्त्वावरील मानधन प्रदान यात काही अनियमित आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य व अधिष्ठात्यांची असणार आहे.

     राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने  (department of higher and technical education)केवळ कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली शासकीय कला महाविद्यालयांमधील सीएचबी प्राध्यापकांच्या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला आहे.अद्याप उच्च शिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील महाविद्यालयांबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध झालेला नाही.

----------------------------------------

" राज्य शासनाने उच्च शिक्षण संचालनालया अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील सीएचबी पदाच्या मानधन वाढीचा अध्यादेश स्वतंत्रपणे व  तात्काळ जाहीर करावा. मंगळवारी प्रसिद्ध झालेला अध्यादेश कला संचालनालया अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांसाठी असल्याचे दिसून येत आहे. त्यात एक तास किती मिनिटांचा असेल याबाबत स्पष्टता नाही. तरी उच्च शिक्षण संचालनालय अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध करताना त्यात वेळेबाबत स्पष्टता द्यावी."

- संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटना