दहा लाखांच्या लाचप्रकरणात डॉ. आशिष बंगिनवार यांच्यावर बडतर्फीची कारवाई

एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेशासाठी बंगिनवार यांनी सोळा लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी १० लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

दहा लाखांच्या लाचप्रकरणात डॉ. आशिष बंगिनवार यांच्यावर बडतर्फीची कारवाई

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे महापालिकेच्या (PMC) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे (Bahartratna Atal Bihari Vajpayee Medical college)तत्कालीन अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार (Dr. Ashish Banginwar) यांना लाचप्रकरणी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)महिनाभरापुर्वी बंगिनवार यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर पालिकेने स्थापन केलेल्या समितीच्या चौकशीतही ते दोषी आढळून आल्याने बडतर्फीची कारवाई करण्यात आली.

एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेशासाठी बंगिनवार यांनी सोळा लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी १० लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यामुळे पुणे शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर महापालिकेने दक्षता समितीचे अध्यक्ष महेश पाटील, आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांची समिती नेमली होती. या समितीनेही बंगिनवार यांना दोषी धरले. त्यामुळे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला.

नापास विद्यार्थ्यांना विद्यापीठाची 'लॉटरी'; सर्वांनाच परीक्षेची एक संधी 

काय आहे प्रकरण?

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्त अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. एमबीबीएसच्या १०० जागा असून त्याची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या शंभर जागांपैकी ८५ जागा राज्य कोट्यांतर्गत म्हणजे सीईटी सेलमार्फत गुणवत्तेच्या आधारे भरल्या जातात. तर उर्वरित १५ जागा इन्स्टिट्यूशनल कोट्यातील असून त्यामध्ये व्यवस्थापन कोटा व एनआरआय कोट्याचा समावेश आहे. 

 

प्रवेशासाठीच्या १५ जागांपैकीच व्यवस्थापन कोट्यातून आपल्या मुलीला प्रवेशासाठी तक्रारदाराने आशिष बंगिनवार यांची भेट घेतली होती. त्यांनी दरवर्षाची शासनमान्य विहीत फी २२ लाख ५० हजार रुपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी १६ लाख लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

 

तक्रारीची पडताळणी केली असता बंगिनवार यांनी प्रवेशासाठी तडजोडीअंती १६ लाख रुपये लाच मागून त्यापैकी पहिला हप्ता १० लाख रुपये कार्यालयात स्वीकारले. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. त्यामुळे बंगिनवार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j