‘द्विलक्षी’मध्ये नवीन वीस अभ्यासक्रमांचा समावेश; प्रत्येकी शंभर गुणांचे दोन विषय निवडता येणार

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार नवीन द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये व्यवसायनिहाय दहा गट निश्चित करण्यात आले आहेत.

‘द्विलक्षी’मध्ये नवीन वीस अभ्यासक्रमांचा समावेश; प्रत्येकी शंभर गुणांचे दोन विषय निवडता येणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांऐवजी (Bifocal Courses) राष्ट्रीय व्यवसाय आराखड्याप्रमाणे (NSQF) नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून सुरू करण्यास राज्य सरकारने (Maharashtra Government) नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार नवीन वीस अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेली मार्गदर्शक तत्वे व सुधारीत मानकांनाही सरकारने मान्यता दिली आहे.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार नवीन द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये व्यवसायनिहाय दहा गट निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिकल मेंटनन्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्कूटर अॅन्ड मोटार सायकल सर्व्हिसिंग, कॉम्युटर सायन्स, जनरल सिव्हील इंजिनिअरींग, मेकॅनिकल मेंटनन्स, कॉमर्स ग्रुप, अॅनिमल सायन्स अॅन्ड डेअरी, क्रॉप सायन्स आणि हॉर्टिकल्चर या गटांचा समावेश आहे.

SPPU News : डॉ. दिलीप उके, प्रा. सुनिल भागवत यांच्यासह सात जणांचे विद्या परिषदेवर नामनिर्देशन

 

प्रत्येक गटामध्ये दोन विषय निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक विषयासाठी शंभर गुण असतील. द्विलक्षी अभ्यासक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयास गटातील दोन्ही अभ्यासक्रमांची निवड करून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांना सध्यस्थितीत २०० गुणांचा एक द्विलक्षी अभ्यासक्रम निवडावा लागतो. त्याऐवजी गटातील प्रत्येकी १०० गुणांचे विषय एक व विषय दोन निवडणे आवश्यक राहील.

 

द्विलक्षी अभ्यासक्रम राबवत असलेल्या विद्यमान महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रमांसाठी आवश्यक मानकांची पुर्तता पुढील दोन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक राहील. तर नवीन महाविद्यालयांना आवश्यक मानकांप्रमाणे पूर्तता केल्याशिवाय मान्यता देण्यात येणार नाही, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विषय एक व विषय दोन साठी स्वतंत्र पूर्ण शिक्षक (प्रात्यक्षिक) अशी दोन शिक्षकीय पदे राहतील.

 

विद्यमान महाविद्यालयांतील सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या शिक्षकांनाच नवीन अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण द्यायचे असल्याने त्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण भोपाळ येथील पंडीत सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर व्होकेशनल एज्युकेशन किंवा अन्य यंत्रणेमार्फत आयोजित करण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयावर राहील. नवीन शिक्षक नेमताना भोपाळ येथील संस्थेने निश्चित केलेली शैक्षणिक पात्रता व अनुभव ग्राह्य धरले जाईल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO