बारावी परीक्षेला ५८ दिवस उलटले, अजून निकाल का नाही? हे आहे निकालाच्या तारखेचे गणित
इयत्ता बारावीची परीक्षा २० मार्च रोजी संपली. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने निकालाच्या कामावर बहिष्कार टाकत आंदोलन केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (HSC Board) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा (12th Examination) निकाल केव्हा जाहीर होणार याबाबतची उत्सुकता विद्यार्थी व पालकांना आहे. सीबीएससी (CBSE), आयसीएसई (ICSE) बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर झाला.मग राज्य मंडळाचा (State Education Board) निकाल केव्हा जाहीर होणार? असा सवाल अनेकांना पडला आहे.परंतु, परीक्षा संपून अद्याप साठ दिवसांचा कालावधीही झाला नाही. अद्याप राज्य मंडळ स्तरावरच निकालाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे निकालासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात मुलींची संख्या ६ लाख ६४ हजार ४११ तर मुलांची संख्या ७ लाख ९२ हजार ७८० एवढी होती. इयत्ता बारावीची परीक्षा २० मार्च रोजी संपली. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने निकालाच्या कामावर बहिष्कार टाकत आंदोलन केले. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासून निकाल तयार करण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाली. परंतु, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढवत बारावीचा निकाल वेळेवर जाहीर व्हावा, या दृष्टीने कामाचे नियोजन केले.
हेही वाचा : ‘या’ सात गोष्टींवर ठरणार शाळांची गुणवत्ता! जिल्हा परिषदेने कंबर कसली
इयत्ता बारावीच्या निकालाचे कामकाज अजूनही सर्व मंडळाच्या स्तरावर सुरू आहे. मंडळांकडून निकालाचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व डेटा राज्य मंडळाकडे प्रोसेसिंग साठी येतो. त्यानंतर निकालातील त्रुटी दूर करून मगच निकाल जाहीर केला जातो. गेल्या पाच वर्षांचा विचार करता एकदाही ६५ दिवसांच्या आत इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला नाही. २० मार्चपासून १७ मे पर्यंत म्हणजेच ५८ दिवसातच निकाल जाहीर होणे शक्य नाही. मे महिना अखेरीस आणि जास्तीत जास्त ५ जून पूर्वी बारावीचा निकाल जाहीर करण्याचा राज्य मंडळाचा प्रयत्न आहे. परंतु, सध्या निकालाची निश्चित तारीख जाहीर करणे शक्य नसल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. देशभरातील १६ लाख ८० हजार २५६ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १६ लाख ६० हजार ५११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. देशभरातील सीबीएसईचे इयत्ता बारावीचे विद्यार्थी आणि एकट्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ सारखीच आहे. त्यातही सीबीएसईच्या परीक्षा राज्य मंडळाच्या परीक्षांपेक्षा काही दिवस लवकर संपल्या होत्या. त्यामुळे राज्य मंडळाच्या उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यासाठी कमीत कमी ६५ दिवस आणि जास्तीत जास्त ९० दिवसांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
परीक्षेचे वर्ष व अंतिम पेपरनंतर निकालाची तारीख (कंसात अंतिम पेपर ते निकालाच्या तारखेपर्यंतचा कालावधी)
वर्ष अंतिम पेपर निकाल
२०१९ २० मार्च २८ मे (७९)
२०२० १८ मार्च १६ जून (८९)
२०२१ परीक्षा नाही ३ ऑगस्ट
२०२२ ७ एप्रिल ८ जून (६४)
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com