मागासवर्गीय शिष्यवृत्तीबाबत मोठी अपडेट; सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील सर्व शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती (SC), विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

मागासवर्गीय शिष्यवृत्तीबाबत मोठी अपडेट; सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा
SC Scholarships

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क   

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत (Social Welfare Department) अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी (Post Matric Scholarship Schemes) अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नवीन व नुतनीकरण अर्ज करण्यासाठीच्या प्रक्रियेस ३० मे पर्यंत मुदतवाढ देण्याच्या निर्णय समाज कल्याण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी आणखी कालावधी मिळणार आहे.

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Dr. Prashant Narnaware) यांनी ही माहिती दिली. राज्यातील सर्व शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. २०२२-२३ यावर्षासाठी प्रलंबित असलेले मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी- परीक्षा फी, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी नवीन व नुतनीकरण (Renewal) चे अर्ज भरता येणार आहेत.

हेही वाचा : वन विभागाकडून परदेशात संशोधनासाठी ७५ शिष्यवृत्ती देण्याची घोषणा

प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी यापूर्वी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु प्रतिवर्षीची नोंदणीकृत अर्ज संख्या लक्षात घेता या वर्षीची अर्ज संख्या तुलनेत कमी असून विद्यार्थ्याचे अर्ज नोदणी प्रलंबित आहेत. त्यामुळे २०२२-२३ चे नवीन अर्ज व नुतनीकरण (Fresh / Renewal ) व २०२१-२२ चे नोंदणीकृत केलेले अर्ज Re- apply करण्याची मुदत ३० मेपर्यंत देण्यात आलेली आहे. सर्व संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी व शिष्यवृत्ती धारक पात्र विद्यार्थी यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास प्रथम प्राधान्याने मुदतीत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन डॉ. नारनवरे यांनी केले आहे. 

ज्या विद्यार्थ्यानी महाडिबीटीवर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्यांनी पुन्हा नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करु नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरुन अर्ज नुतनीकरण केल्यास व एका पेक्षा जास्त युजर आयडी तयार करुन अर्ज रद्द झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयांची राहील, असेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले.

हेही वाचा : MPSC : २०२१ पासूनच्या जाहिराती, परीक्षा अन् निकालाची सद्यस्थिती पहा एका क्लिकवर

अर्ज भरण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास प्रवेशीत असणा-या महाविद्यालयाशी, तसेच संबंधित महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या समान संधी केंद्रांशी संपर्क साधता येईल. संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या Grievance / Suggestions ( तक्रार )  या टॅबद्वारे आपली अडचण संकेतस्थळावर नोंदविण्याची सुविधा आहे. मुदतीत कार्यालयास अर्ज प्राप्त न झाल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील व त्यास सामाजिक न्याय विभाग जबाबदार राहणार नाही. असेही  डॉ. नारनवरे सांगितले.

शिष्यवृत्याचे अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : https://mahadbt.maharashtra.gov.in