तुमचे नाव घेऊन अपात्र करायला लावेन; केसरकरांची भावी शिक्षिकेला तंबी अन् विरोधकांनी उगारली छडी

केसरकर हे एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असताना एक महिला त्यांना शिक्षक भरतीबाबत विचारणा करत होती. भरतीची साईट ओपन झाली असली तरी पुढची प्रक्रिया होत नसल्याने ही महिला संतप्तपणे सांगत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

तुमचे नाव घेऊन अपात्र करायला लावेन; केसरकरांची भावी शिक्षिकेला तंबी अन् विरोधकांनी उगारली छडी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kedarkar) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. शिक्षक भरतीसंदर्भात (Teachers Recruitment) एक महिला आणि केसरकर यांच्यातील हा संवाद आहे. त्यामध्ये संबंधित महिला भरतीबाबत सातत्याने केसरकर यांना विचारणा करत असताना केसरकर यांनी थेट त्यांना तंबी दिली. अजिबात मध्ये बोलायचं नाही. अन्यथा तुमचे नाव घेऊन अपात्र करायला लावेन, असे केसरकर म्हणाले आहेत. त्यावरून राजकारण तापले असून विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका करत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

 

केसरकर हे एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असताना एक महिला त्यांना शिक्षक भरतीबाबत विचारणा करत होती. भरतीची साईट ओपन झाली असली तरी पुढची प्रक्रिया होत नसल्याने ही महिला संतप्तपणे सांगत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. त्यावर केसरकर हे बोलत असतानाही संबंधित महिला मध्येच बोलत असल्याचे पाहून केसरकर यांनी संबंधित महिलेला थेट तंबी दिली.

‘द्विलक्षी’मध्ये नवीन वीस अभ्यासक्रमांचा समावेश; प्रत्येकी शंभर गुणांचे दोन विषय निवडता येणार

 

केसरकर म्हणाले होते की, शिक्षक भरतीसाठी संकेतस्थळ चालू असून भरती सुरू आहे. श्रध्दा आणि सबुरी ठेवा, आजपर्यंत कुणी शिक्षक भरती केली का? मी केली आहे. जेवढा मी प्रेमळ, तेवढा कडकही आहे. उद्या तुम्ही मुलांनाही ही बेशिस्त शिकवत असाल तर मला मान्य नाही, शिस्तीने शिकवणारे शिक्षकच हवे आहेत. माझे अधिकार म्हणजेच सर्वस्व, माझ्या दृष्टीने विद्यार्थी म्हणजे काहीच नाही. हे मला अजिबात मान्य नाही. अजिबात मध्ये बोलायचं नाही. अन्यथा तुमचे नाव घेऊन अपात्र करायला लावेन.

 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केसरकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, तुम्ही किती कडक आहात, ते दिसतंय शिक्षणमंत्री महोदय. तुमची भाषा पण महाराष्ट्र ऐकतोय. तुमचं वर्तनही महाराष्ट्र बघत आहे. शिक्षण मंत्र्यांचा हा Boss Attitude नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण तरुणी खपवून घेणार का?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केसरकर यांच्यावर ट्विटरवरून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, व्हिडिओ पाहून 'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?' असा प्रश्न पडतो. एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहिर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO