पेपर फोडणारे तलाठी भरतीत टॉपरच्या यादीत, निकालाबाबत अनेक आक्षेप

पेपर फोडणारे तलाठी भरतीत टॉपरच्या यादीत, निकालाबाबत अनेक आक्षेप

पेपर फुटीच्या घटनांमुळे वादात सापडलेल्या बहुप्रतिक्षित तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असला तरी त्यामध्ये अनेक अक्षपार्ह गोष्टी दिसून येत असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. कारागृहात शिक्षा भोगलेल्या उमेदवाराला 200 पैकी 182 गुण मिळाले असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे एकाच कुटुंबातील अनेकांना चांगले गुण मिळाले आहेत, त्यामुळे संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांनी कोणत्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली होती, याबाबत स्पष्टता आणावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.

हेही वाचा:राजकीय पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढणारच : डॉ. अरुण अडसूळ

 राज्यात विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेत सातत्याने पेपर फुटीच्या घटना घडल्या तरीही राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न देता परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र ,स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या प्रकरणी यापूर्वीच न्यायालयात धाव घेतली असून पुढील सुनावणी येत्या आठवड्यात होणार आहे. तसेच पेपर फुटीच्या घटनांचे पुरावे ज्यांच्याकडे असतील त्यांनी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केली आहे. त्यामुळे यापुढील काळात समन्वय समितीकडून सर्व पुराव्यांसह न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

 अकोला पोलीस भरती मध्ये दुसऱ्या एका उमेदवाराच्या जागी डमी उमेदवार म्हणून परीक्षेत बसलेला एक उमेदवार तलाठी भरतीमध्ये 182 गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पारदर्शक झाली आहे किंवा नाही याबाबत संशय घेण्यास वाव आहे. तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाला असल्याचे विविध घटनांमुळे दिसून येते. त्यामुळे उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यापूर्वी संबंधित उमेदवारांनी कोणत्या परीक्षा सेंटरवर परीक्षा दिली.त्या परीक्षा सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे. तसेच त्याला प्रत्यक्ष गुणपत्रिकेत मिळालेले गुण तपासावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.