बालभारतीच्या पुस्तकातील वहीचे पान पाहिले का?  यंदापासून पुस्तकातच करता येणार महत्वाच्या नोंदी

बालभारतीच्या नवीन पुस्तकांचे पहिल्या टप्प्यातील छपाईचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे शाळांना वाटप सुरू केले जाणार असल्याचे समजते. सध्या ही पुस्तके बालभारतीच्या गोडाऊनमध्ये आहेत.

बालभारतीच्या पुस्तकातील वहीचे पान पाहिले का?  यंदापासून पुस्तकातच करता येणार महत्वाच्या नोंदी
Balbharati New Book

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तिक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (Balbharati) येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची (Balbharati Books) रचना बदलली आहे. इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले असून तीन ते चार विषयांसाठी एकच पुस्तक राहणार आहे. तसेच प्रत्येक पुस्तकामध्ये एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे. त्या पानाच्या वर माझी नोंद असे लिहिण्यात आले आहे. त्यावर बालभारतीचा लोगोही छापण्यात आल्याचे दिसते.

बालभारतीच्या नवीन पुस्तकांचे पहिल्या टप्प्यातील छपाईचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे शाळांना वाटप सुरू केले जाणार असल्याचे समजते. सध्या ही पुस्तके बालभारतीच्या गोडाऊनमध्ये आहेत. त्याचे वाटप जिल्हा, तालुका व शाळा अशा टप्प्यांमध्ये होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांसाठी जुनी पुस्तकेही बाजारात उपलब्ध असतील.

हेही वाचा : बारावी निकालाची तारीख जवळ आली तरी ३७२ उत्तरपत्रिका सोडविणारा सापडेना

पाठ्यपुस्तकांच्या नव्या रचनेनुसार तीन-चार विषयांची पुस्तके चार भागांत एकत्रित केली जाणार आहे. पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कमीत-कमी वह्या आणाव्यात यासाठी प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे. या पानावर दोन्ही बाजूला धड्याशी संबधित नोंदी करता येऊ शकतात.

याविषयी बोलताना मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले (Mahendra Ganpule) म्हणाले, प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडले आहे. वर्गामध्ये शिक्षकांकडून धडा शिकविला जात असताना विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भातील नोंदी वहीच्या पानावर करणे अपेक्षित आहे. काही अवघड शब्द, संकल्पना, आकृत्या, काही महत्वाच्या पुस्तकाबाहेरील नोंदी करता येऊ शकतात.

वर्गामध्ये वह्या आणाव्याच लागणार असल्याचेही गणपुले यांनी सांगितले. गृहपाठ किंवा वर्गपाठासाठी स्वतंत्र वह्या करण्याचा पर्याय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे वहीचे पान पुस्तकामध्ये जोडले गेले असले तरी संबंधित विषयांच्या वह्या वर्गात आणाव्या लागणार आहेत. त्यामुळे ओझे कमी करण्यासाठी वहीच्या पानाचा उपयोग होणार नाही. पण प्रत्येक विषयानुसार पुस्तकाचे चार भाग करण्यात आल्याने पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे, असेही गणपुले यांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2