बारावी निकालाची तारीख जवळ आली तरी ३७२ उत्तरपत्रिका सोडविणारा सापडेना

इय़त्ता बारावीच्या भौतिकशास्त्राच्या परीक्षेमध्ये ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदल असल्याच्या तक्रारी मॉटरेटरकडून औरंगाबाद विभागीय मंडळाकडे करण्यात आल्या आहे.

बारावी निकालाची तारीख जवळ आली तरी ३७२ उत्तरपत्रिका सोडविणारा सापडेना
HSC Result Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result) पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC Board) निकालाची जोरदार तयारी सुरू आहे. पण दुसरीकडे भौतिकशास्त्र (Physics Examination) विषयाच्या ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदलाच्या तक्रारींबाबत अद्याप काहीच ठोस हाती लागलेले नाही. त्यामुळे या ३७२ जणांबाबत काहीच निर्णय न झाल्याने निकालाबाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे.

इय़त्ता बारावीच्या भौतिकशास्त्राच्या परीक्षेमध्ये ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदल असल्याच्या तक्रारी मॉटरेटरकडून औरंगाबाद विभागीय मंडळाकडे करण्यात आल्या आहे. त्यानंतर मंडळाकडून संबंधित उत्तरपत्रिका असलेले विद्यार्थी, त्यांचे पालक, परीक्षा केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य, मॉडरेटर यांची चौकशी सुरू केली. पण मागील दहा दिवसांपासून काहीच हाती लागलेले नाही. या उत्तरपत्रिकांवर नेमकी उत्तरे कुणी लिहिली याची माहिती अद्याप मंडळाला मिळालेली नाही. बीड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये असा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा : शाळांच्या कागदपत्रांची तपासणी वेगात; २४ तारखेपर्यंतच मुदत

परीक्षा संपल्यानंतर केंद्रांमध्ये सर्व उत्तरपत्रिका एकत्रित होतात. तिथून पुढे केंद्रप्रमुखांच्या सहीने या उत्तरपत्रिका ररकडे दिल्या जातात. रनरच्या माध्यमातून पुढे कस्टोडियनकडे आणि शेवटी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या नावे टपालाने त्या पाठविल्या जातात. प्राचार्यांकडून संबंधित विषय शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासणीसाठी दिल्या जातात. याच प्रवासात उत्तरपत्रिकांवर इतर कोणीतरी उत्तरे लिहिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण अद्याप त्याबाबत ठोस माहिती हाती आलेली नाही. एकाच व्यक्तीकडून उत्तर लिहिल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळातील अधिकारीही यावर बोलण्यास तयार नाहीत. विभागीय मंडळाकडून अंतिम अहवाल आल्यानंतर त्यानुसार ३७२ विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवून इतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याची मंडळाने तयारी केल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणामुळे निकालाची तारीख पुढे जाणार नाही, याची काळजी मंडळाकडून घेतली जात आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2