कमवा व शिका योजनेचे मानधन आता ६० रूपये

विद्यापीठाचे आधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रति तास ६० रुपये मानधन देण्यात यावे, असा प्रस्ताव अधिसभेसमोर सादर केला. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. 

कमवा व शिका योजनेचे मानधन आता ६० रूपये

आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ पैसे नाहीत म्हणून थांबू नये , या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे  कमवा व शिका योजना राबवली जाते. या योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रति तास ६० रुपये मानधन दिले जावे, असा प्रस्ताव विद्यापीठाच्या आधिसभेत रविवारी मंजूर करण्यात आला. परंतु, केवळ प्रस्ताव मंजूर करू नये तर त्याची अंमलबजावणी सुद्धा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    विद्यापीठातील विविध विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कामवा व शिका योजनेअंतर्गत प्रति तास ४५ रुपये इतका कामाचा मोबदला दिला जातो. परंतु,वाढत्या महागाईचा विचार करता हा मोबदला कमी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. विद्यापीठाचे आधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रति तास ६० रुपये मानधन देण्यात यावे, असा प्रस्ताव अधिसभेसमोर सादर केला. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेअंतर्गत महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि विद्यापीठ आवारातील विद्यार्थी यांच्यासाठी एकूण ५ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे.

    विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेअंतर्गत कौशल्यावर आधारित काम करता यावे, या उद्देशाने विद्यापीठात नर्सरी उभी करण्याचा विद्यापीठाचा विचार असल्याचे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी आधिसभेत सांगितले. सध्या विद्यापीठातील विविध विभागांमध्ये कमवा शिका योजनेचे विद्यार्थी कार्यालयीन कामकाज करत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रति दिवस ३ तास एवढे काम करता येते. मात्र गेल्या काही वर्षांचा विचार करता कमवा व शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारच घटली आहे. त्यात वाढ करण्याबाबत विद्यापीठाने विचार करावा, अशी मागणी आजी माजी आदिसभा सदस्यांकडून केली जात आहे.

आधिसभा सदस्य राहुल पाखरे यांनी कमवा व शिका योजनेत सहभागी होणारे विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी व संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन विद्यापीठाने या योजनेसाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे निधीचा अपव्य होणार नाही.तसेच निधी अभावी एकही विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही.

---------------

 पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी करून घेतले जात नाही. विद्यापीठाकडून निधीची तरतूद केली जात असली तरी त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होत नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांपासून कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ न मिळालेल्या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेत सहभागी करून घ्यावे .‌‌

- राहुल ससाणे, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती-

-------------

विद्यापीठाच्या आधी सभेत कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला ही निश्चितच चांगली बाब आहे. परंतु, विद्यापीठाने त्याची अंमलबजावणी सुद्धा करावी. त्यासाठी विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आणू नये.

- संतोष ढोरे, माजी अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

-------------