वैद्यकीय शिक्षणमंत्रीच म्हणतात NEET परीक्षा तात्काळ रद्द करा; महाराष्ट्रावर होतोय अन्याय

या निकालामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यार्थ्यांना सरकारी किंवा खाजगी काॅलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे ही राज्यावर अन्याय करणारी परीक्षा आहे. ती परीक्षा तात्काळ रद्द झाली पाहिजे.

वैद्यकीय शिक्षणमंत्रीच म्हणतात NEET परीक्षा तात्काळ रद्द करा; महाराष्ट्रावर होतोय अन्याय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या NEET UG प्रवेश परीक्षा मला वाटतंय पैसे खाऊनच झाल्या असतील. गेल्या वर्षी ७२० पैकी ७२० गुण घेणारे दोनच विद्यार्थी होते. आता त्याची संख्या एवढी वाढली आहे की ती ६७ वर गेली. काही विद्यार्थांना ग्रेस मार्कस दिले आहेत. या निकालामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यार्थ्यांना सरकारी किंवा खाजगी काॅलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे ही राज्यावर अन्याय करणारी परीक्षा आहे. त्यामुळे ही परीक्षा तात्काळ रद्द झाली पाहिजे (The exam should be canceled immediately) अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला करण्यात येईल, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Medical Education Minister Hasan Mushrif) यांनी सांगितले. 

मुश्रीफ म्हणाले, NEET परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत असून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा तातडीने रद्द करावी, असे आम्ही राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला कळवणार आहोत. नीट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी दोन-दोन तीन-तीन वर्ष मेहनत करीत असतात, पालकही त्यांच्या पाठीशी असतात. परंतु, जर अशा पद्धतीने निकाल लागून विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, तर ते चुकीचे आहे. यासाठी आम्ही न्यायालयात जाण्याचा प्रयत्नही करीत आहोत. ही परीक्षा रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 

NEET च्या ६० हून अधिक विद्यार्थी-पालकांनी शुक्रवारी मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी पालकांनी विविध प्रश्न मुश्रीफ यांच्यापुढे मांडले. त्यानंतर, नीट परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे न्यायवैदक परीक्षण करण्यासाठी आणि त्याची सीबीआयकडून चौकशी होण्यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी पालकांना दिले.

NEET च्या परीक्षेची सीबीआय चौकशी व न्यायवैदक परीक्षण व्हावे. समुपदेशन व प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात यावी. विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली असल्यामुळे परीक्षा रद्द करू नये. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिले आहेत ते नियमांच्या विरुद्ध असल्यामुळे रद्द करावे. महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असे पालकांचे म्हणणे आहे.