अतिवृष्टीचा फटका दहावीच्या परीक्षेला; इतिहासाचा पेपर पुढे ढकलला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा घेतली जात आहे.

अतिवृष्टीचा फटका दहावीच्या परीक्षेला; इतिहासाचा पेपर पुढे ढकलला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या अनेक भागात सध्या अतिवृष्टी होत असल्याने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोकणासह काही भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून त्याचा फटका इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेलाही बसला आहे. शुक्रवारी (दि. २७) राज्याच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने दहावीचा इतिहासाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा १८ जुलैपासून सुरू झाली आहे. दहावीची परीक्षा १ ऑगस्टपर्यंत तर बारावीची १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार होती. तर शुक्रवारी इयत्ता दहावीचा सामाजिक शास्त्रे पेपर एक इतिहास व राज्यशास्त्र विषयाची परीक्षा होती.

शुक्रवारी राज्याच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने इतिहासाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता ही परीक्षा दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत घेतली जाणार असल्याची माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षा लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता दहावीची परीक्षा ३ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही मंडळाकडून अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही.