शालेय गणवेशाचे नियोजन बिघडले; विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार

विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासाठी काही महिने वाट पहावी लागणार आहे.परंतु, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.

शालेय गणवेशाचे नियोजन बिघडले; विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education) सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना  एकसारखा गणवेश (identical uniforms) देण्याचा निर्णय घेण्यात आला.राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी याबाबत घोषणाही केली.त्यासाठी कापड विकत घेऊन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (Women's Economic Development Corporation) सहकार्याने गणवेश शिवून घेण्याचे ठरवण्यात आले.मात्र,शाळा सुरू होण्यास सुमारे आठ दिवस बाकी असताना अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत शिक्षण विभागाचे कोणतेही ठोस नियोजन नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासाठी (School uniform) काही महिने वाट पहावी लागणार आहे.परंतु,शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मोफत गणवेश योजनेच्या (Free uniform scheme) माध्यमातून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. या गणवेशाची रचना स्काऊट व गाईड (Scout and Guide) विषयास अनुरूप आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक रंग, एक दर्जा असलेला सारख्याच गणवेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने कापड खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया (E-tendering process) राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते. 

गणवेशाच्या शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने घेतले जाणार होते.तसेच पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत समान रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने मोफत गणवेश योजनेबाबत संबंधित शाळा तसेच, शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याच्या शासनाचा प्रयत्न होता. परंतु, यावर्षी सुध्दा शिक्षण विभागाने गणवेशाबाबत ठोस निर्णय घेतल्याचे दिसत नाही.  

शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देणे शक्य नसले तरी पाठ्यपुस्तके देण्याबाबत आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.तसेच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे, असे पुणे जिल्हा परिषदेतील (Pune Zilla Parishad) अधिकाऱ्यांनी सांगितले.