विद्यार्थी सलग सहा दिवस गैरहजर राहिल्यास शिक्षक थेट घरी जाणार

शाळेत न येण्याचे कारण काय, हे शिक्षक घरी जाऊन पाहतील. लहान भावंडांची काळजी घेतल्याने मूल शाळेत येत नसेल तर त्याच्या भावंडांना अंगणवाडी केंद्रात दाखल केले जाईल.

विद्यार्थी सलग सहा दिवस गैरहजर राहिल्यास शिक्षक थेट घरी जाणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) योगी सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) लागू करण्याच्या उद्देशाने नवीन नियम तयार करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. या नियमानुसार राज्यातील शाळांमधील अभ्यासासाठी नवीन कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती (Students Attendance) वाढवण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. याअंतर्गत एखादा विद्यार्थी सतत काही दिवस गैरहजर राहिल्यास शिक्षक (Teachers) त्या विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचतील, त्याच्या पालकांशी  चर्चा करतील. अशा पद्धतीने अनेक नवीन बदल करण्यात येत आहे.

 

सध्या उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनला आहे. त्या दृष्टीने काही उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. याअंतर्गत एखादा विद्यार्थी सलग तीन दिवस शाळेत न आल्यास पालकांशी फोनवर बोलले जाईल, अशी योजना आखण्यात आली आहे. आणि जर तो सतत ६ दिवस शाळेत आला नाही तर शिक्षक त्याच्या घरी जातील.

शिष्यवृत्तीसाठी नोडल अधिकाऱ्यांचे बायोमॅट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य; अर्जासाठी ३० नोव्हेंबरची कालमर्यादा

 

शाळेत न येण्याचे कारण काय, हे शिक्षक घरी जाऊन पाहतील. लहान भावंडांची काळजी घेतल्याने मूल शाळेत येत नसेल तर त्याच्या भावंडांना अंगणवाडी केंद्रात दाखल केले जाईल. त्यासाठी सर्व शाळांच्या पटांगणात चालणाऱ्या अंगणवाडी केंद्रांचे रूपांतर पूर्व प्राथमिक शाळेत करण्यात आले आहे. तसेच शेती किंवा इतर घरातील कामामुळे मूल शाळेत येत नसेल तर शिक्षक त्याच्या पालकांना शाळेचे आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगतील. अशा परिस्थितीत मुलांना व  त्यांच्या पालकांना शाळेचे महत्त्व समजावून सांगून दररोज शाळेत येण्यास प्रवृत्त केले जाईल.

 

शाळांमध्ये उपस्थिती वाढवण्यासाठी मुलांना सर्व प्रकारे प्रेरित केले जात आहे. त्याअंतर्गत प्रत्येक विकास गटाच्या कार्यालयात लावलेल्या फलकावर त्या-त्या गटातील अशा पाच शाळांची आणि त्यांच्या मुख्याध्यापकांची नावे लिहिली जातील,  जिथे जास्तीत जास्त विद्यार्थी असतील. इतकेच नव्हे तर दर महिन्याला होणाऱ्या ब्लॉक आणि जिल्हास्तरीय बैठकीत या शाळांच्या मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात येणार आहे.

 

याशिवाय  राज्य सरकार शाळेच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. शाळांमध्ये आठवड्यातून एकूण २९ तास अध्यापन होणार असून सोमवार ते शुक्रवार या कालावधीत वर्ग घेण्यात येणार आहेत. महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या शनिवारी वर्ग घेण्यात येतील तर दोन शनिवार बंद राहतील. नवीन नियमांच्या अंमलबजावणीच्या आधारे, वर्गांचा कालावधी ३५ मिनिटांचा असेल आणि गणित, हिंदी, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषयांसह मुख्य विषयांच्या वर्गांचा कालावधी ४० ते ५० मिनिटांचा असेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO