शिष्यवृत्तीसाठी नोडल अधिकाऱ्यांचे बायोमॅट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य; अर्जासाठी ३० नोव्हेंबरची कालमर्यादा

केंद्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून घेतल्या जाणा-या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती करीता नोडल अधिकारी यांचे बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीसाठी नोडल अधिकाऱ्यांचे बायोमॅट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य; अर्जासाठी ३० नोव्हेंबरची कालमर्यादा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण- साक्षरता विभागाकडून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (एनएमएमएस) आणि केंद्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून घेतल्या जाणा-या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती करीता नोडल अधिकारी यांचे बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे,अशी माहिती राज्याचे योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी दिली.

 राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी)वर दोन्ही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. राज्यात येत्या १७ नोव्हेंबर अखेरपर्यंत  एनएमएमएस साठी मागील परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक घोषित झालेल्या  ११,६८२ पैकी ६ हजार ३३५ नवीन अर्ज तर पुर्वीपासून  शिष्यवृत्ती घेत असलेल्या शिष्यवृत्तीधारकांचे नूतनीकरणाचे ३५ हजार ४१ पैकी १६ हजार ५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर दिव्यांग मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे २४२ नवीन व नूतनीकरणाचे २३६ पैकी ६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. 
 
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे विद्यार्थी, ज्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत त्या शाळेचे शाळा प्रमुख (एच.ओ.आय), नोडल अधिकारी (आय.एन.ओ), जिल्हा शिक्षणाधिकारी (डी.एन.ओ) आणि राज्य नोडल अधिकारी (एस.एन.ओ) यांचे या शिष्यवृत्ती योजनांकरीता चालू वर्षी पासून पहिल्यांदाच बायो-मॅट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. बनावट अर्जांना प्रतिबंध करणेसाठी तसेच यंत्रणेतील जबाबदार अधिकारी/कर्मचाऱ्याकडून अर्जांची पडताळणी होण्यासाठी हा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील महिन्यात बायो-मॅट्रिक प्रमाणीकरण प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. 

बायोमॅट्रिक प्रमाणीकरण प्रक्रियेसाठी आधार ही महत्वाची बाब असून प्रमाणीकरण झाल्यानंतर आधार मध्ये संबंधितांनी दुरुस्ती करू नये. आधार मध्ये दुरुस्ती करून घ्यायची असल्यास ती या प्रक्रीयेपूर्वी करून घ्यावी, असे आवाहन डॉ.महेश पालकर यांनी केले आहे.

दोन्ही शिष्यवृत्ती करीता ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी आता फक्त २ आठवड्यांचा अवधी उरला असून विहित कालावधीत नवीन व नूतनीकरणाचे अर्ज दाखल करावेत. तसेच शाळास्तरावर येत्या १५ डिसेंबर २०२३ पर्यंत आणि जिल्हास्तरावर येत्या ३० डिसेंबर २०२३ पर्यंत नोडल अधिकाऱ्यांनी अर्जांची पडताळणी कागदपत्रे तपासून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

   योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर म्हणाले की, शाळांनी एन.एस.पी २.० पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दरवर्षी प्रोफाईल अद्यावत करणे आवश्यक आहे. तसेच केवायसी पडताळणी एकदाच करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, त्या शाळेमधूनच ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. एनएमएमएस शिष्यवृत्ती करीता विद्यार्थ्यांचे नाव व जन्मतारीख आधारनुसार असणे आवश्यक आहे. एनएमएमएस परीक्षेच्या निकालपत्रकातील नाव व जन्मतारीख यामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास इयत्ता ९वीच्या नवीन विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळांनी शिक्षणाधिकारी यांचे मार्फत योजना संचालनालयास  पाठविणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबत दिव्यांगत्वाचा प्रकार हा युडीआयडी ओळखपत्र आणि एनएसपी पोर्टलवरील अर्ज यामधील एकसमान असावा. शिवाय युडीआयडी ओळखपत्रावरील जन्मतारीख व आधारवरील जन्मतारीख एकसारखी असल्यास ऑनलाईन अर्ज करता येईल.

एनएमएमएस व दिव्यांग शिष्यवृत्ती व्यतिरिक्त इतर शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यास लाभ घ्यावयाचा असल्यास विद्यार्थास लॉगीनद्वारे नवीन/ नुतनीकरण अर्ज रद्द (withdraw) करता येईल. मात्र एकदा रद्द झालेला नूतनीकरणाचा अर्ज पुन्हा नव्याने दाखल करता येत नाही. दोन्ही शिष्यवृत्तीच्या नवीन अर्जांमध्ये नोंदणी करताना चुकीची माहिती भरली असल्यास विद्यार्थी लॉगीनद्वारे अर्ज रद्द (withdraw) करून पुन्हा नव्याने अर्जाची आधारनुसार नोंदणी करावी.

एनएमएमएस शिष्यवृत्तीकरिता राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थांची परीक्षा घेण्यात येते.त्यासाठी परीक्षा परिषदेच्या www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा लागतो.तर शिक्षण संचालनालय योजनामार्फत शिष्यवृत्ती वितरणाची कार्यवाही केली जाते.यासाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर(एनएसपी पोर्टलवर) शिष्यवृत्तीधारक घोषित झाल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागतो.चालू शैक्षणिक वर्षात २४ डिसेंबर २०२३ रोजी राज्यात ७३० केंद्रावर परीक्षा होणार आहे. यासाठी १३ हजार ५२३ शाळातील २ लक्ष ६६ हजार २०२ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.   
---------------
  
"एनएमएमएस शिष्यवृत्तीधारकास इ.९वी ते १२ वी या चार वर्षात प्रतिवर्षी रक्कम रु. १२ हजार तर दिव्यांग शिष्यवृत्ती धारकास इ. ९वी, १० वी करीता रक्कम रु.९ हजार ते १४ हजार ६०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीची रक्कम आधार कार्डला लिंक असलेल्या विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते.तयासाठी बँक खाते व मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे."

-डॉ. महेश पालकर   शिक्षण संचालक (योजना)