Law Result : पेपर तपासणीला उशिरा लावणारे कॉलेज आणि १२ प्राध्यापकांना विद्यापीठाकडून नोटीस
पुणे शहरातील एका नामांकित महाविद्यालयाने उत्तर पत्रिका तपासून देण्यास तब्बल १०० दिवसांहून अधिक कालावधी लावला. त्यामुळे विद्यापीठातर्फे या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) प्रशासनाकडून विविध परीक्षांचे निकाल लवकर लागावेत यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. मात्र, विधी अभ्यासक्रमाचे निकाल (Law Result) प्राध्यापक व महाविद्यालयांच्या चुकीमुळे उशिरा लागले. त्यामुळे आता विद्यापीठाने संबंधित महाविद्यालय व दोषी प्राध्यापकांना नोटीस बजावली आहे, असे परीक्षा विभागातील (Exam Department) विश्वासनीय सूत्रांनी सांगितले. (Notice from university to college and 12 professors for delaying paper checking)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मान्यताप्राप्त प्राध्यापकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातही विधी अभ्यासक्रमाच्या मान्यताप्राप्त शिक्षकांची संख्या फारच कमी आहे. याच प्राध्यापकांच्या सहाय्याने विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या विविध परीक्षांचे निकाल लावले जातात. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल लावणे बंधनकारक आहे. परंतु, पुणे शहरातील एका नामांकित महाविद्यालयाने उत्तर पत्रिका तपासून देण्यास तब्बल १०० दिवसांहून अधिक कालावधी लावला. त्यामुळे विद्यापीठातर्फे या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
UGC NET २०२३ : परीक्षेचा निकाल जाहीर
प्राध्यापक विधी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासून देत नाहीत. त्यामुळे निकालास उशीर होत असल्याचे परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक वेळा खासगीत व खुलेपणाने बोलून दाखवले होते. त्यामुळे निकाल उशीर का लागला? याचे कारण शोधल्यानंतर त्यास संबंधित शाखेचे प्राध्यापक जबाबदार असल्याचे समोर आले.
विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लावण्याची जबाबदारी जशी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची आहे, तशीच ती प्राध्यापकांची सुद्धा आहे. प्राध्यापकांना परीक्षेचे काम टाळता येत नाही. परंतु, विद्यापीठाशी संलग्न अहमदनगर जिल्ह्यातील ३ विधी महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी परीक्षेच्या कामात हलगर्जीपणा केला. त्यामुळे परीक्षा विभागातर्फे १२ प्राध्यापकांना नोटीस बजावण्यात आली आहे. आता विद्यापीठातर्फे या प्राध्यापकांवर काय कारवाई केली जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुंबई, पुण्यासह राज्यातील ६६ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता
कायद्याचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाकडून आणि प्राध्यापकांकडूनच विद्यापीठ कायद्यातील तरतुदीचे पालन होत नाही. नियमानुसार ४५ दिवसात निकाल लावण्याचे बंधन असताना उत्तरपत्रिका तपासण्यास विलंब केला जात आहे. विद्यापीठातर्फे अनेक परीक्षांचे निकाल उशिरा लावले जातात, म्हणून परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाते. परंतु निकाल उशिरा लावण्यास प्राध्यापक आणि महाविद्यालय जबाबदार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता अधिकार मंडळाचे सदस्य संबंधितांवर कारवाईची मागणी करणार आहेत का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD
eduvarta@gmail.com