प्रसिद्ध पर्यावरण पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. आर. एस. पप्पू यांचे निधन

डॉ. पप्पू १९९३ मध्ये डेक्कन कॉलेजमधून पर्यावरण पुरातत्वशास्त्रातील सहयोगी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. फर्ग्युसन महाविद्यालयातून भूविज्ञानात एम.एस्सी.पदवी प्राप्त केली होती.

प्रसिद्ध पर्यावरण पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. आर. एस. पप्पू यांचे निधन
Dr R S Pappu

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

भारतातील प्रसिद्ध पर्यावरण पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. आर.एस. पप्पू (Dr R. S. Pappu) यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी शुक्रवारी (दि. १५ सप्टेंबर) पुणे येथे राहत्या घरी निधन झाले. डॉ. पप्पू १९९३ मध्ये डेक्कन कॉलेजमधून (Deccan College) पर्यावरण पुरातत्वशास्त्रातील सहयोगी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. फर्ग्युसन महाविद्यालयातून भूविज्ञानात एम.एस्सी.पदवी प्राप्त करून, त्यांनी डेक्कन कॉलेजमधे पुरातत्वशास्त्रातील डॉक्टरेट संशोधनासाठी प्रवेश घेतला आणि १९६६ मध्ये पीएच.डी. पूर्ण केली.

 

डॉ. आर. एस. पप्पू यांनी कर्नाटकातील बागलकोट येथील घटप्रभा खोऱ्यातील अनगवाडी आणि कोवल्ली या दोन अश्मयुगीन स्थळांचे उत्खनन केले. त्यांच्या पीएच.डी प्रबंधाचे (प्लेइस्टोसीन स्टडीज इन द घटप्रभा बेसिन) डेक्कन कॉलेजने १९७४ मधे पुस्तक प्रकाशित केले. पुढे त्यांची भूरूपशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली व नंतर पर्यावरण पुरातत्वशास्त्रातील सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यांना बढती मिळाली.

 

मध्य कृष्णा खोऱ्यातील प्रामुख्याने घटप्रभा व मळप्रभा नदी परिसरातील अश्मयुगीन स्थळांचा शोध आणि अभ्यास त्यांनी अनेक वर्ष केला. त्या संशोधनावर आधारित पुस्तक १९९४ मध्ये डॉ. सुषमा देव यांच्यासोबत डेक्कन कॉलेजने प्रकाशित केले. पुस्तकाचे नाव ‘मॅन लँड रेलशनशिप ड्युरिंग पॅलेओलिथिक टाइम्स इन द कलाडगी बेसिन’ होते.

 

अनेक पुरातत्त्वीय स्थळांचा भूमिवापर पद्धती आणि प्राचीन वसाहत रचनांचा अभ्यास त्यांनी केला, या मध्ये प्रामुख्याने दायमाबाद व इनामगाव या ताम्रपाषाणयुगीन स्थळांचा समावेश आहे. निवृत्तीनंतर त्यांची भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद या संस्थेकडून वरिष्ठ संशोधक म्हणून नेमणूक झाली. त्या प्रकल्पातून ‘द्वीपकल्पीय भारताची अच्युलियन संस्कृती: एक पर्यावरणीय दृष्टीकोन’ हे पुस्तक २००१ साली प्रकाशित झाले. डॉ. पप्पू हे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी पीएच.डी साठी २ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे ५० हुन अधिक लेख विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j