सावधान : परीक्षा अन् गुणांच्या जीवघेण्या 'स्पर्धेत' तुमचाही पाल्य अडकतोय का?
इयत्ता बारावीनंतर विविध्य व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी चाचणी घेतली जाते. बारावीतील गुणांपेक्षा या परीक्षेतील गुणांनाच जास्त महत्व प्राप्त झाले आहे.
दीपा पिल्ले पुष्पकांथन
आयआयटीसह (IIT) देशभरातील विविध नामांकित शिक्षण संस्थांमध्ये (Educational Institutes) प्रवेश मिळविण्यासाठी सध्या खासगी क्लासेसचे (Private Classes) पेव फुटले आहे. प्रवेश परीक्षांची (Entrance Test) तयारी करणाऱ्या मुलांसाठी महत्वाचे ठिकाण समजले जाणारे म्हणजे राजस्थान (Rajasthan) मधील कोटा (Kota) शहर. पण हे शहर आता विद्यार्थ्यांसाठी (Students) मृत्यूचा सापळा ठरत आहे. २०२३ या एका वर्षात आता पर्यंत फक्त आठ महिन्यांत २३ विद्यार्थ्यांनी गुण आणि परीक्षेच्या ताणात येऊन आत्महत्या केल्या आहेत.
महाराष्ट्रातील (Maharashtra) लातूरच्या अविष्कार कासले या विद्यार्थ्याने कोटा येथील एका क्लासच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. त्याच्या आत्महत्येनंतर चार तासांतच या शहरात आणखी एका विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळले. त्यामुळे परीक्षा व त्यामधील गुणांसाठीच्या जीवघेण्या स्पर्धेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. इयत्ता बारावीनंतर विविध्य व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी चाचणी घेतली जाते. बारावीतील गुणांपेक्षा या परीक्षेतील गुणांनाच जास्त महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे नामांकित खासगी क्लासेससाठी पालकांकडून अमाप पैसा ओतला जातो. त्याचा तणाव विद्यार्थ्यांवरही असतो. विविध भरतीसाठीच्या स्पर्धा परीक्षांचीही हीच गत झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी आत्महत्याच्या बातम्या रोज कानावर धडकू लागल्या आहेत.
UPSC, MPSC सारख्या स्पर्धा उत्तीर्ण होणे, डॉक्टर, इंजिनिअर सारख्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी होणारी रस्सीखेच, पालकांच्या मुलांकडून वाढणाऱ्या अपेक्षा, या अवघड परीक्षा पास झालो नाहीतर आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही मुलांमध्ये वाढणारी ही असुरक्षिततेची भावना, खासगी क्लासेसला जाणारा पैसा, परीक्षांना ' प्रेस्टिज इश्यू' शी जोडल्यामुळे त्यांना आलेले नको तेवढे महत्व अशा अनेक मुद्यांवर मनोसोपचार तज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांनी 'एज्युवार्ता ' शी संवाद साधला.
डॉ. लुकतुके यांनी पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोटा आणि एकूणच देशभरातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या या विषयी बोलताना डॉ. लुकतुके म्हणाले, " मुलांना आता आयुष्य संपवणे, आत्महत्या करणे हा खूप सोपा पर्याय वाटू लागला आहे, आपण आयुष्यात अपयशी होऊ या भीतीने यशासाठी प्रयत्न करण्यापेक्षा मुले मृत्यूला कवटाळत याला मुख्य कारण म्हणजे पालक आणि पाल्य यांच्यात वाढत जाणारा विसंवाद. कधी कधी पालकांकडून मुलांवर नको इतका अभ्यासाचा ताण दिला जातो. आणि एका परीक्षेत उत्तीर्ण झाला नाहीतर तर तो पुढे आयुष्यात काहीच करू शकणार नाही, असे त्यांच्या मनावर बिंबवले जाते, तर कधी विद्यार्थी स्वतः स्वतःसाठी एक टार्गेट सेट करतात.
प्लॅब बी तयार हवा
यश नाही मिळाले तर पुढे काय त्यासाठीचा प्लॅन बी मुलांकडे नसतो. फक्त तेवढेच एक टार्गेट डोक्यात असते. आणि त्यात जर अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले किंवा अनुत्तीर्ण झाले तर ती मुले मृत्यूला कवटाळतात. पालक आणि पाल्यांच्या योग्य संवादातून या गोष्टी टाळता येऊ शकतात. आपला मुलगा किंवा मुलगी काय करू शकतात, त्यांची बौद्धिक कुवत काय आहे, त्यांना कशात रुची आहे या गोष्टींवर दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे. समजा आपल्या पाल्याला त्या परीक्षेत अपयश आले तर तो पुढे आणखीन कोणते पर्याय निवडू शकतो, त्या क्षेत्रात आणखीन यशस्वी होता येईल, असा विश्वास मुलांमध्ये जागृत करायला हवा, असे लुकतुके यांनी सांगितले.
मुलांशी सातत्यपूर्ण संवादाची गरज
आपला पाल्य अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या ताणामुळे डिप्रेशनमध्ये जातोय हे जर पालकांच्या वेळीच लक्षात आले तर त्यांच्याशी बोलून, त्यांना धीर देऊन, गरज पडल्यास त्यांचे कौन्सलिंग करून पालक मुलांना आत्महत्येपासून परावृत्त करू शकतात. त्यामुळे दोघांमध्ये संवाद आवश्यक आहे, असा सल्ला डॉ. लुकतुके यांनी दिला. डॉ. लुकतुके म्हणाले, " ठराविक परीक्षांना आपल्या 'प्रेस्टिज' शी जोडू नका. सध्या करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, त्याकडे पहा. त्या क्षेत्रात आपले करिअर घडवा. मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्या. त्यांच्या पाठीशी उभे रहा. नाहीतर या परीक्षांच्या जीवघेण्या स्पर्धेचा तुमचा पाल्यही बळी पडू शकतो, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com