प्राध्यापकांकडे बनावट सेट-नेट प्रमाणपत्र; पडताळणीत धक्कादायक माहिती समोर, 'युजीसी'चे पत्र

सहायक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी राज्यात राज्य पात्रता परीक्षा किंवा राष्ट्रीय पात्रता परीक्षा पात्र ठरणे बंधनकारक आहे. तर शालेय स्तरावर शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्राध्यापकांकडे बनावट सेट-नेट प्रमाणपत्र; पडताळणीत धक्कादायक माहिती समोर, 'युजीसी'चे पत्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षकाच्या नोकरीसाठी टीईटीचे (TET) बनावट प्रमाणपत्र दिल्याचे प्रकार काही महिन्यांपुर्वी समोर उघडकीस आले होते. आता प्राध्यापक (Professor) पदासाठीही नेट (NET) व सेटचे (SET) बनावट प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती, नागपूर विद्यापीठातील जवळपास ३३ प्राध्यापकांची सेट-नेट प्रमाणपत्र बनावट असल्याचे समजते. संबंधित प्राध्यापकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू असून यामागे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

सहायक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी राज्यात राज्य पात्रता परीक्षा किंवा राष्ट्रीय पात्रता परीक्षा पात्र ठरणे बंधनकारक आहे. तर शालेय स्तरावर शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही महिन्यांपुर्वी शिक्षकांनी टीईटीचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. आता सेट-नेट प्रमाणपत्रही बनावट आढळून आल्याने महाविद्यालय स्तरावर खळबळ उडाली आहे.

उच्चशिक्षित बेरोजगारांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन; उच्च शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील १९ प्राध्यापकांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे खात्रीशीर माहिती आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून याबबात महिनाभरापुर्वी विद्यापीठाला पत्र आले आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकाने २००४ मध्ये नेट प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळविली होती. हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे पडताळणीमध्ये उघडकीस आले आहे.

 

युजीसीच्या पत्रानंतर विद्यापीठाकडून संबंधित महाविद्यालयांत कार्यरत असलेल्या शिक्षकांची प्रमाणपत्रांची माहिती मागवून त्याची पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीमध्ये नेमक्या किती प्राध्यापकांनी बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली आहे, ही माहिती समोर येणार आहे. अमरावती, नागपूर आणि नांदेड विद्यापीठातील जवळपास ७० प्राध्यापकांबाबत तक्रार असल्याचे समजते. यामागे एखादे रॅकेट कार्यरत आहे किंवा नाही, हे पोलिसांत तक्रार झाल्यानंतरच समोर येणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO