नॅक मुल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांची नावे प्रवेशप्रक्रियेतून वगळली का? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत.

नॅक मुल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांची नावे प्रवेशप्रक्रियेतून वगळली का? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
Higher Education Minister Chandrakant patil

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅक मुल्यांकन (NAAC Accreditation) न करणाऱ्या महाविद्यालयांचे प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश (Degree Admission) प्रतिबंधित करण्याचा निर्णय उच्च शिक्षण संचालकांनी (Higher Education) नुकताच जाहीर केला आहे. त्याच्या कार्यवाहीसाठी संबंधित विद्यापीठांच्या (State Universities) कुलसचिवांनी संलग्न महाविद्यालयांना परिपत्रक पाठवले आहे. पण त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित महाविद्यालयांची नावे प्रवेश प्रक्रियेतून वगळली आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत. नॅक न केलेल्या महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशास बंदी घातल्याने विविध अभ्यासक्रमांची विद्यापीठ निहाय, विद्याशाखानिहाय प्रवेश क्षमता सुमारे ४० टक्के कमी होत आहे, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

SPPU : नॅक नसलेल्या महाविद्यालयांना प्रथम वर्षास प्रवेश बंदी; कुलसचिवांनी काढले परिपत्रक

एका बाजूने केंद्रीय प्रवेशप्रक्रियेद्वारे दि. १५ जुनपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेतून नॅक मुल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांची नावे वगळली आहेत का? नसल्यास होणाऱ्या गोंधळात कोण जबाबदार?, असा सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला. संबंधित महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेतून वगळल्याने, कमी होणाऱ्या प्रवेश क्षमतेमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेश संधी कमी होणार आहेत. त्या साठी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पर्यायी प्रवेश व्यवस्था म्हणून विद्यमान नॅक मुल्यांकन प्राप्त महाविद्यालयांना द्वितीय सत्र सुरू करण्यास तातडीने परवानगी द्यावी, पर्यायाने त्यांची प्रवेश क्षमता १०० टक्के वाढू शकेल, नॅक मुल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांना विद्यापीठ संलग्नता रद्द करण्याची अंतिम कायदेशीर सूचना द्यावी, प्रवेश प्रक्रियेत प्रवेश क्षमता कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश संधी कमी होणार नाही याची दक्षता शासनाने व विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी, अशा मागण्या कुलकर्णी यांनी केल्या आहेत.

जेएनयु मधील 'स्कूल' ला द्यायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ; राज्य शासनाकडून मिळेना प्रतिसाद

त्याचप्रमाणे नॅक मुल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयात द्वितीय वर्ष ते अंतिम पदवी वर्ष पदवी अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता विद्यापीठ, शासन, प्रशासन यांनी घ्यावी, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी या प्रश्नांबाबत विद्यापीठ व शासन स्तरावरील संबधित अधिकार मंडळांनी स्पष्टता करावी, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo