मुक्त विद्यालय मंडळ : इयत्ता पाचवी व आठवीसाठी शुक्रवारपासून नोंदणी

शाळा अर्धवट सोडलेल्या घटकांना मुक्त विद्यालय मंडळाअंतर्गत इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी समकक्ष परीक्षेसाठी संपर्क केंद्रांमार्फत नाव नोंदणी करता येते.

मुक्त विद्यालय मंडळ : इयत्ता पाचवी व आठवीसाठी शुक्रवारपासून नोंदणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये (MSBOS) इयत्ता पाचवी व आठवीसाठी शुक्रवारपासून (दि. १ सप्टेंबर) नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी असेल. विद्यार्थ्यांना (Students) मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी (Online Registration) प्रवेश अर्ज करता येईल.

मंडळाच्या सचिव माणिक बांगर यांनी ही माहिती दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांना दि. १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तर दि. २ ते २० सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे आवश्यक आहे. तर दि. २९ सप्टेंबर रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

कॉमिक बुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आरोग्य, नागरी मूल्ये, लैंगिक समानतेचे धडे

दरम्यान, औपचारिक शिक्षण न घेतलेल्या म्हणजे पूर्वी शाळेत न गेलेल्या किंवा शाळा अर्धवट सोडलेल्या घटकांना मुक्त विद्यालय मंडळाअंतर्गत इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी समकक्ष परीक्षेसाठी संपर्क केंद्रांमार्फत नाव नोंदणी करता येते. या परीक्षांना शासनाच्या नियमित परीक्षांची समकक्षता आहे.

अशी आहे प्रवेशाची पात्रता –

  • इयत्ता पाचवीसाठी वय १० वर्षे तर आठवीसाठी १३ वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही.
  • वयाचा दाखला सादर करावा लागेल.
  • पूर्वी औपचारिक शाळेत गेला असल्यास, पूर्वीच्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक.
  • वय वर्षे १८ पेक्षा जास्त असलेला उमेदवार औपचारिक शाळेत गेला नसल्यास विहित नमुन्यातील स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक.
  • वय वर्षे १८ पेक्षा कमी असलेला उमेदवार औपचारिक शआळेत गेला नसल्यास, त्याच्या पालकाने विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक.

असे असेल शुल्क -

नोंदणी शुल्क – १ हजार रुपये

पुनर्नोंदणी शुल्क – ५०० रुपये

परीक्षा शुल्क प्रती विषय – १०० रुपये

विलंब शुल्क – २०० रुपये  

प्रवेश अर्जासाठी संकेतस्थळ : https://msbos.mh-ssc.ac.in

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo