अभ्यासक्रमात  रामायण , महाभारताच्या समावेशावर एनसीईआरटीचे स्पष्टीकरण 

एनसीईआरटीचा याच्याशी काहीही संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) चे  संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी केला आहे.

अभ्यासक्रमात  रामायण , महाभारताच्या समावेशावर एनसीईआरटीचे स्पष्टीकरण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

प्रा.  सी.आय. इसाक हे पाठ्यपुस्तक किंवा अभ्यासक्रम समितीचा भाग नाहीत. त्यांनी व्यक्त केलेली मते ही त्यांची स्वतःची आहेत. एनसीईआरटीचा याच्याशी काहीही संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) चे  संचालक दिनेश प्रसाद सकलानी (NCERT Director Dinesh Prasad Saklani) यांनी केला आहे.एनसीईआरटी अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यासारख्या महाकाव्यांचा समावेश करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

सीआय इसाक यांनी नुकतेच , "रामायण आणि महाभारत यासारख्या महाकाव्यांचा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ शकतो,तसेच सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत सारख्या कथांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान, देशभक्ती आणि त्यांच्या देशाप्रती अभिमान त्यांच्या किशोरावस्थेत वाढू शकतो."असे वक्तव्य केले होते.

या संदर्भात एका इंग्रजी वृत्त समुहाशी बोलताना सकलानी म्हणाले,  "प्रा. सी.  आय.  इसाक सामाजिक विज्ञान समितीचा भाग असल्याचा दावा करतात आणि त्यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या शिफारसी सादर केल्या होत्या. त्यानंतर एनसीईआरटीने पाठ्यपुस्तके आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) वर विशेष १९ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. इसाक यांचा यात कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही. या अभ्यासक्रमाला अंतिम स्वरूप देणाऱ्या समित्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रमाला अंतिम रूप देण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. ही एक निरंतर प्रक्रिया आहे. "

नवीन मुद्रित पुस्तके पुढील शैक्षणिक सत्रापूर्वी एप्रिल-मे पर्यंत उपलब्ध करून दिली जातील. या बदलासाठी 19 सदस्यीय समितीला नॅशनल सिलॅबस अँड टीचिंग लर्निंग मटेरियल कमिटी (NSTC) असे नाव देण्यात आले आहे. हे राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) च्या धर्तीवर शालेय अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्यापन साहित्य आणि शिक्षण संसाधने तयार करत आहेत,असेही सकलानी यांनी स्पष्ट केले. 
--------------------