‘ब्ल्यू बेल्स’ शाळेला दणका; विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजित करण्याचे आदेश

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कारवाईमध्ये ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले दहशतवादी कृत्यासाठी वापरले जात असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

‘ब्ल्यू बेल्स’ शाळेला दणका; विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजित करण्याचे आदेश
NIA seizes 2 floors of a school in Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क    

दहशतवादी कृत्यांसाठी (Terrorist Activities) वापर होत असलेल्या कोंढवा बुद्रुक येथील ब्ल्यू बेल्स (Blue Bells School) शाळेला शिक्षण विभागाने दणका दिला आहे. शाळेने प्रथम मान्यता आणि स्व मान्यता खोट्या व बनावट कागदपत्रांचा वापर करून मिळवल्याचा ठपका ठेवत विभागाने शाळेची मान्यता रद्द केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना (Students) इतर शाळांमध्ये समायोजित केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार, ब्ल्यू बेल्स हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेजने इयत्ता पहिली ते बारावी इंग्रजी माध्यम सर्व शाखा स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्याबाबतचा आदेश आणि शिक्षण उपसंचालक यांच्याकडील शाळा परवानगी दिल्याबाबतचे आदेश सादर करून या कार्यालयाकडून प्रथम मान्यता व स्व मान्यता मिळाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : UGC कडून आमदार अमरीश पटेल यांना दणका; विद्यापीठाबाबत मोठा निर्णय

या कार्यालयाकडून यासंदर्भात शासन स्तरावरून आदेशाची पडताळणी करून घेतली असता वरील दोन्ही आदेश खोटे व बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. खोट्या व बनावट कागदपत्रांचा वापर करून या कार्यालयाकडे प्रथम मान्यता व स्व मान्यता प्रस्ताव सादर करून मान्यता मिळवली असल्याने दोन्ही आदेश रद्द करण्यात येत आहेत. शाळा अनधिकृत असल्याने सर्व विद्यार्थ्यांना नजिकच्या मान्यताप्राप्त शाळेत समायोजित करून तसा अहवाल सात दिवसांत कार्यालयास सादर करावा, असे गायकवाड यांनी आदेशात नमूद केले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कारवाईमध्ये ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले दहशतवादी कृत्यासाठी वापरले जात असल्याचे नुकतेच समोर आले आहे. त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केलेल्या चौकशीतच या शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले. तत्कालीन शिक्षण उपसंचालक आहिरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र या शाळेकडे आहे. परंतु या पत्राचा आवक जावक क्रमांक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. तसेच या शाळाकडे असणाऱ्या मान्यता पत्रावरील आहिरे यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/               

काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय तपास यंत्रणेने ब्लु  बेल्स  शाळेच्या इमारतीतील चौथा आणि पाचवा मजला जप्त केला आहे. दहशतवादी कृत्यांची तयारी याठिकाणी केली जात होती. पीएफआयकडून मुस्लिम तरूणांना आपल्या जाळ्यात ओढून भारतात २०४७ अखेरपर्यंत इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करणाऱ्यांना संपविण्यासाठी किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित केले जात होते. तरुणांना चाकूसह इतर धोकादायक शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, असा दावा एनआयएने केला आहे.

एनआयएने मागील वर्षी २२ सप्टेंबर महिन्यात शाळेच्या इमारतीतील या दोन मजल्यांची झडती घेतली होती. या मजल्यांवरील खोल्यांमध्ये केलेल्या तपासांत हाती आलेल्या दस्तऐवजांनुसार जागेचा वापर केडरसाठी शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी केल्याचे आढळून आले आहे. दशतवादी कृत्यांसाठी या तरुणांना प्रवृत्त केला जात होते. सरकार तसेच विशिष्ट समाजाचे नेते व संस्थांविरोधात त्यांना भडकवले जात होते, असे तपास संस्थेकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.