ना शिक्षकांना खुर्ची, ना मुलांना बाके...अशी असेल वर्गांची नवी रचना

जेव्हा मुलांना वर्गात बसून फक्त फळा आणि शिक्षकांकडे पाहण्यास सांगितले जाते तेव्हा असे दिसते की या दोन गोष्टीच शिक्षणाचा मुख्य स्त्रोत आहेत.

ना शिक्षकांना खुर्ची, ना मुलांना बाके...अशी असेल वर्गांची नवी रचना
School Classroom

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

एका रांगेत एका पाठोपाठ फरशीवर किंवा बाकावर बसलेले विद्यार्थी (Students), विद्यार्थ्यांच्या समोर खुर्चीवर बसलेले शिक्षक (Teacher) हे वर्गातील वर्षानुवर्षे दिसत असलेले चित्र आता बदलणार आहे.  राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचा (NCF) मसुदा प्रसिद्ध झाल्यापासून पुढील वर्षापासून शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शालेय शिक्षण (School Education) व्यवस्थेत आमूलाग्र बदल सुचवण्याबरोबरच NCF मध्ये शाळेतील वर्गांचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या अनेक गोष्टीही आहेत.

NCF मध्ये केलेल्या शिफारशीनुसार,  जेव्हा मुलांना वर्गात बसून फक्त फळा आणि शिक्षकांकडे पाहण्यास सांगितले जाते तेव्हा असे दिसते की या दोन गोष्टीच शिक्षणाचा मुख्य स्त्रोत आहेत. यापेक्षा मुलांना अर्धवर्तुळात बसवावे किंवा गटागटाने बसण्याची व्यवस्था करावी, असे सुचविण्यात आले आहे. या सगळ्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना समोर बसवण्याची प्रथाही बंद होईल. वर्गातील सर्व मुले अभ्यासात सहभागी होतील याची काळजी शिक्षकांनी घ्यावी. तसेच शिक्षकाचे प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष असावे, यासाठी त्यांनी एका जागी बसून राहण्यापेक्षा त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये उभेराहून शिकवावे, त्यामुळे शिक्षकांना वर्गात बसण्यासाठी  खुर्ची देऊ नये, अशी सूचनाही NCF  मध्ये करण्यात आली आहे. 

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

शालेय गणवेशाबाबतही एनसीएफमध्ये असे म्हटले आहे की, गणवेशाचा रंग आणि डिझाइन निवडताना खास गोष्टी लक्षात घ्या. शाळेची इच्छा असेल तर ते अधिक पारंपारिक, आधुनिक किंवा जेंडर न्यूट्रल ड्रेस निवडू शकतात. पण हे बदल प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने किती उपयुक्त ठरेल, या नियमांची अमलबजावणी यशस्वीरीत्या शक्य होईल का आदी शंका उपस्थित केल्या जात आहेत. याविषयी ‘एज्युवार्ता’ ने शिक्षण तज्ज्ञांशी संपर्क साधला.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख म्हणाले, " NCF मध्ये या नियमांची शिफारस करताना ३०:१ हे  सूत्र गृहीत धरले होते. पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. आता शाळांमध्ये एका-एका वर्गात ६०-६० विद्यार्थी असतात. या विद्यार्थ्यांना अर्धगोलाकार किंवा गट गटाने बसवणे कठीण आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याआधी शाळांवर कठोर निर्बंध आणणे आवश्यक आहे. तसे झाले तरच या नियमाची अंमलबजावणी होऊ शकेल. 

हेही वाचा : ‘ब्ल्यू बेल्स’ शाळेला दणका; विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजित करण्याचे आदेश

शिक्षण तज्ज्ञ महेंद्र गणपुले यांनी सांगितले की, "NCF ने विद्यार्थ्यांवर अधिकाधिक लक्ष देता यावे, प्रत्येक विद्यार्थ्याचा वर्गातील सहभाग वाढावा या दृष्टीने ही शिफारस केली आहे. पण शहरी भागात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शक्य होईल का, यावर शंका उपस्थित होते. भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांची संख्या यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. नियमानुसार एका वर्गाची पटसंख्या ३०  आणि एक शिक्षक असावे. पण  शहरी भागात एका वर्गाची पटसंख्या ६० ते ७०  च्या घरात असते. NCF ने केलेल्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना  वर्गात अर्धवर्तुळाकार किंवा गटागटाने बसवायचे असेल तर एका वर्गात ३० विद्यार्थी असणे आवश्यक आहे. असे झाले तरच या नियमाची अंमलबजावणी यशस्वीरीत्या करता येईल.