प्राध्यापक भरतीत गैरव्यवहार ; संस्थेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वासदर्शक ठराव

अध्यक्षांनी धर्मदाय आयुक्तांकडून आणलेल्या नोटीसीमुळे आता या प्रकरणातील कायदेशीर बाबी तपासाव्या लागणार आहेत, असे संचालक मंडळातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

प्राध्यापक  भरतीत गैरव्यवहार ; संस्थेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वासदर्शक ठराव

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेतील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्यांनी संस्थेच्या अध्यक्षावरच अविश्वास ठराव संमत केला आहे. शुक्रवारी बोलवण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला. मात्र, अध्यक्षांनी धर्मदाय आयुक्तांकडून आणलेल्या नोटीसीमुळे आता या प्रकरणातील कायदेशीर बाबी तपासाव्या लागणार आहेत, असे संचालक मंडळातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेतील महाविद्यालयामधील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी काही दिवसांपूर्वी मुलाखती घेण्यात आल्या. ४७ जागांसाठी तब्बल २ हजार ९०० उमेदवारांनी अर्ज केले. केवळ तीन दिवसात या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यामुळे वाद निर्माण झाला होता. याबाबत महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडे चौकशीची मागणी केली होती.त्यात संस्थेच्या संचालकांनीच या भरतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले.

संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्यांनी अध्यक्षांवर आरोप केले.संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांच्यावरच आरोप असल्यामुळे त्यामुळे शुक्रवारी (दि.४) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संचालक मंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष पद दुसऱ्या ज्येष्ठ संचालकांकडे देण्यात आले. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयातील एक नोटीस बैठकीत सादर केली. आता या नोटीसीला उत्तर कसे द्यायचे ? याचा कायदेशीर सल्ला इतर संचालकांकडून घेतला जात आहे.

राज्यातील इतर शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक भरतीमध्ये लाखोंचा काळाबाजार झाल्याचा आरोप यापूर्वी झाला आहे. परंतु,त्याचे पुरावे सादर करणे शक्य झाले नाही. या प्रकरणातही भरतीमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला जात आहे.मात्र, त्याचे पुरावे समोर आल्याशिवाय हे प्रकरण शांत होणार नाही, असे तज्ञांकडून बोलले जातात.

     मराठा जिल्हा विद्या प्रसारक समाज या संस्थेने १०५ वर्षाची उज्वल परंपरा जपली असून ही संस्था शाहू महाराजांच्या देणगी पासून सुरू झाली. ग.रा. मस्के फलके गुरुजी, विलासराव आठरे, माधवराव मुळे, ह. कृ. काळे यासारख्या ऋषितुल्य माणसांनी ही संस्था मोठी केली. परंतु ,१०५ वर्षाच्या इतिहासामध्ये कुठल्याही अध्यक्षा विरोधात अविश्वास दर्शक ठराव मांडला गेला नाही. बहुजन समाजाची ही संस्था उजळ माथ्याने समाजामध्ये 105 वर्षापासून कार्यरत आहे. या संस्थेचे नावलौकिक घालवण्याचे काम करणाऱ्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन संस्थेचे संचालक मंडळातील काही सदस्य करत आहेत. 

दरम्यान,नंदकुमार झावरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.