राज्य परीक्षा परिषदेचे स्थलांतर; तीन जुलैपासून राज्य मंडळाच्या कार्यालयातून कामकाज

पुणे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर सध्या परीक्षा परिषदेचे कार्यालय आहे. परीक्षा परिषदेत एकूण सुमारे दहा अधिकारी असून ३० लिपिक व २१ शिपाई आहेत.

राज्य परीक्षा परिषदेचे स्थलांतर; तीन जुलैपासून राज्य मंडळाच्या कार्यालयातून कामकाज
Maharashtra State Council of Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षक पात्रता परीक्षा, शिष्यवृत्ती, टायपिंग (Typing Examination) यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे (MSCE) स्थलांतर होणार आहे. येत्या ३ जुलैपासून परिषदेचे कामकाज भांबुर्डा -शिवाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (State Education Board) इमारतीतून होणार आहे. परिषदेच्या सध्याच्या कार्यालयाच्या जागी नवीन इमारत उभारली जाणार आहे. (Maharashtra State Council of Examination)

पुणे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर सध्या परीक्षा परिषदेचे कार्यालय आहे. परीक्षा परिषदेत एकूण सुमारे दहा अधिकारी असून ३० लिपिक व २१ शिपाई आहेत. परिषदेची विविध कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. परीक्षा परिषदेकडे गोपनीय कागदपत्र ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नाही. त्यामुळे ही सर्व कार्यालये व गोडाऊन एकाच सुसज्ज इमारतीत असावीत, या उद्देशाने सध्याच्या जागेवर पाच मजली इमारत बांधली जाणार आहे.

न्यायालयाच्या दणक्यानंतर सरकारला जाग; विशेष शिक्षकांना थकित साडे अकरा कोटी रुपये मिळणार

नवीन इमारत व्यावसायिक स्वरुपाची असेल. त्यामध्ये परिषदेच्या कार्यालयांसह इमारतीतील काही जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठीही केला जाणार आहे. त्यातून परिषदेला उत्पन्न मिळणार आहे. लवकरच या इमारतीचे काम सुरू होणार आहे. हे काम संपेपर्यंत परिषदेच्या कामकाज राज्य शिक्षण मंडळाच्या इमारतीतून चालणार आहे.

 याबाबत परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी माहिती दिली. परिषदेमार्फत विभागीय परीक्षा, व्यावसायिक परीक्षा, शिष्यवृत्ती विषयक परीक्षा, इत्यादीबाबत आयोजन करण्यात येते. त्यामुळे परिषदेचा विद्यार्थी, पालक, शिक्षक व शैक्षणिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संपर्क येतो. सध्यस्थितीत परिषदेचे राज्यस्तरीय कार्यालयासाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे दि. ३ जुलैपासून परिषदेचे तात्पुरत्या स्वरुपात नवीन इमारत तयार होईपर्यंत नवीन जागेत स्थलांतर केले जात आहे. मंडळाच्या इमारतीतील दुसरा व चौथ्या मजल्यावर परिषदेचे कार्यालय असेल, असे दराडे यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2