UGC कडून आमदार अमरीश पटेल यांना दणका; विद्यापीठाबाबत मोठा निर्णय

जानेवारी-फेब्रुवारी २०२३, जुलै-ऑगस्ट २०२३ आणि जानेवारी- फेब्रुवारी २०२४ या तीन सत्रांतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

UGC कडून आमदार अमरीश पटेल यांना दणका; विद्यापीठाबाबत मोठा निर्णय
MLA Amrish Patel

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) या अभिमत विद्यापीठातील (Deemed University) दुरस्थ आणि ऑनलाईन अभ्यासक्रमांवर बंद घातली आहे. भाजपचे आमदार अमरीश पटेल (MLA Amrish Patel) हे या विद्यापीठाचे कुलपती आहेत. मुंबईतील श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे हे विद्यापीठ असून या संस्थेचे अध्यक्षही पटेल आहेत. (University Grants Commission bans distance and online courses in MLA Amarish Patels NMIMS)

युजीसीच्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोगाने हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार जानेवारी-फेब्रुवारी २०२३, जुलै-ऑगस्ट २०२३ आणि जानेवारी- फेब्रुवारी २०२४ या तीन सत्रांतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षांत विद्यापीठाला दुरस्थ व ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : महाविद्यालयांना तज्ज्ञ मिळेनात; ‘तासिका’च्या मानधनात घसघशीत वाढ

जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू होणार्‍या शैक्षणिक सत्रासाठी केवळ UGC द्वारे संस्थेमध्ये प्रत्यक्ष तपासणी केली जाईल. त्यानंतर आवश्यक मंजूरी मिळाल्यानंतर अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. त्यामुळे संस्थेच्या कोणत्याही दुरस्थ आणि ऑनलाईन अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी यांनी केले आहे.

जोशी यांनी जारी केलेल्या नोटिशीमध्ये नमूद केले आहे की, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेने युजीसीच्या नियमांचे पालन केलेले नाही. सेंटर फॉर इंटरनल क्वालिटी एश्युरन्सचे (सीआयक्यूए) कामकाज, स्वयं अध्ययन व ई-लर्निंग साहित्याचा दर्जा, सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन लर्निंगची परिभाषा, शुल्क परतावा याबाबतीत नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. दुरस्थ आणि ऑनलाईन अभ्यासक्रमांबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. आयोगाच्या २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या ५६६ व्या बैठकीत याची गांभीर्याने दखल घेण्यात आली.  

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

दरम्यान, संस्थेच्या मुंबई, नवी मुंबई, धुळे, शिरपूरसह हैद्राबाद, बेंगलुरू, इंदौर, चंदीगड या शहरांमध्येही शैक्षणिक संकुल असून विविध व्यावसायिक, नियमित अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. युजीसीच्या निर्णयाचा या अभ्यासक्रमांवर कोणताही परिणाम होणार नाही. आयोगाने केवळ दुरस्थ व ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्यास तात्पुरती बंदी घातली आहे.