मोफत गणवेशाचा नुसताच थाट; शासनाची घोषणा हवेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच दिली कबुली

राज्यात शासकीय शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये सुमारे ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या शाळामध्ये व्यवस्थापन समित्या गणवेशाबाबत निर्णय घेतात.

मोफत गणवेशाचा नुसताच थाट; शासनाची घोषणा हवेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच दिली कबुली
School Education Minister Deepak Kesarkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यभरातील सर्व शासकीय शाळांमधील (Government Schools) इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत गणवेश (School Uniform) वाटपाचा निर्णय हवेतच विरण्याची शक्यता आहे. शलेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर  (School Education Minister Deepak Kesarkar) यांच्याकडून विविध कार्यक्रमांमध्ये मोफत गणवेशाबाबत भाष्य केले जात असले तरी प्रशासकीय पातळीवर त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याचे समोर आले आहे. विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता काहीच अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.

राज्यात शासकीय शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये सुमारे ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या शाळामध्ये व्यवस्थापन समित्या गणवेशाबाबत निर्णय घेतात. शाळेचा गणवेश अधिकाधिक आकर्षक करण्याकडे व्यवस्थापनाचा कल असतो. त्यामुळे प्रत्येक शाळेचा गणवेश वेगळा दिसतो. पुर्वी शाळांमध्ये मुलांसाठी पांढरा शर्ट व खाकी पँट आणि मुलींसाठी निळा फ्रॉक, पंजाबी ड्रेस असे गणवेश असायचे. ते आता बहुतेक शाळांमधून हद्दपार झाले आहेत.

हेही वाचा : अकरावी प्रवेशाला सुरूवात; प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरा या तारखेपासून

शिक्षणमंत्री केसरकर यांच्या मोफत गणवेशाच्या घोषणेनंतर पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला. त्यावर अनेकांनी टीकाही केली. इतक्या कमी कालावधीत मुलांना गणवेश कसे मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. पण त्यानंतरही शिक्षण विभागाचे अधिकारी पहिल्याच दिवशी गणवेशाचे वाटप होईल, असे सांगत होते. आता शाळा सुरू होण्यास एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी उऱलेला असताना गणवेशाबाबत काहीच अंतिम निर्णय झालेला नाही.

सर्व शासकीय शाळांधील मुलांना एकसारखाच गणवेश देण्याचे प्रस्तावित आहे. विद्यार्थ्यांना गणवेशाचे कापड द्यायचे की तयार गणवेश द्यायचा, कापडाची खरेदी, रंग, अशा विविध बाबी अजूनही चर्चेच्या पातळीवरच असल्याचे समजते. कापड खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागेल. इतक्या कमी कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांपर्यंत कापड पोहचवणे, गणवेश शिवणे अशक्यप्राय गोष्ट आहे.

हेही वाचा : येरवडा येथे नवीन ‘आयटीआय’; तुकड्या, पदांना मान्यता, नऊ व्यवसायांचे प्रशिक्षण मिळणार

याविषयी शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता नकारार्थी उत्तर दिले. गणवेश वाटपाबाबत काही निर्णय झाला आहे का, या प्रश्नावर त्यांनी अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोफत गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार की नाही, याबाबतचा संभ्रम आता वाढला आहे. मंत्री केसरकर किंवा विभागातील इतर अधिकारी याबाबत स्पष्टपणे बोलण्यास तयार नाहीत. गणवेश मिळणार किंवा नाही, हे कोणीच ठामपणे सांगू शकत नसल्याने शाळा व्यवस्थापन बुचकाळ्यात पडले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2