भारतीय शैक्षणिक प्रणालीचा आपल्यालाच विसर पडला

भारतीय शैक्षणिक प्रणालीचा आपल्यालाच विसर पडला

तक्षशिला आणि नालंदा यांसारख्या प्राचीन विद्यापीठांनी एकेकाळी जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित केले होते.  या विद्यापीठांनी अनके  विद्यार्थी घडविले देखील. आपल्या देशावर झालेली आक्रमणे, विलय, लूट आणि वसाहतवाद यांचा देशाच्या ज्ञान भांडवलावर महत्त्वपूर्ण असा परिणाम झाला.  अत्यंत समृद्ध असलेल्या भारतीय शैक्षणिक प्रणालीचा आपल्यालाच विसर पडला. जरी आपल्याला १९४७ मध्ये ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले असले तरी देखील आपण इंग्रजी शिक्षणाचेच समर्थन करीत आहोत,असे मत क्यूएस वर्ल्ड रँकिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विन फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे क्यूएस वर्ल्ड रँकिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विन फर्नांडिस यांनी लिहिलेल्या "भारताचे ज्ञान वर्चस्व:एक नवी पहाट" (‘India’s Knowledge Supremacy: The New Dawn’)  या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फर्नांडिस बोलत होते. कार्यक्रमास सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका व प्र - कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिसच्या कुलगुरू डॉ.रजनी गुप्ते  अधिष्ठाता डॉ. भामा वेंकटरमणी आदी उपस्थित होते.

 डॉ. फर्नांडिस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्यूएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेतून मला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. शिक्षणाचा समृद्ध इतिहास असूनही, भारताची उच्च शिक्षण प्रणाली कठोर आणि खंडित झाली आहे.  विद्यार्थ्यांना अनेकदा कठोर शिस्तबद्ध संरचनांचे पालन करावे लागते. या व्यतिरिक्त, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये संशोधनावर भर दिला जात नाही.  तसेच विविध विषयांमध्ये संशोधन निधीची कमतरता आहे. यामुळे जागतिक क्रमवारीत भारतीय संस्थांचे प्रतिनिधित्व कमी झाले आहे.  सध्या एकही भारतीय विद्यापीठ कोणत्याही प्रतिष्ठित जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत आघाडीच्या विद्यापीठांमध्ये नाही. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  म्हणाले, विद्यापीठांच्या गुणवत्तेचे नॅकद्वारे मूल्यमापन केले जाते. आपल्याकडे हार्वर्ड, केंब्रिज आदी विद्यापीठांबद्दल नेहमीच कुतूहल  राहिले आहे.परंतु एके काळी भारताची जगात ज्ञानासाठी ओळख होती. स्वामी विवेकानंद, अरविंद यांनी आपले ज्ञान श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले आहे. 

आपल्या इतिहासाचे केवळ गौरवीकरण करत राहिल्यास व दुसऱ्यांचे कौतुक करत राहिल्यास आपण संपून जाऊ. आपल्याला पुढे जाण्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठांचे कॅरेक्टर बदलावे लागेल. मातृभाषेला महत्त्व देणे ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुलभूत बाब आहे.  आपली संस्कृती, ज्ञान परंपरा ही मुघल, ब्रिटिश, डच, पोर्तुगिज संपवू शकले नाहीत. आपण ध्येय निश्चित करून काम केल्यास नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आपला आपल्या तत्त्वांवर विश्वास असणे आवश्यक आहे, असे कोश्यारी यांनी सांगितले.