वारे गुरूजींच्या शाळेला अध्यक्ष चषक! वर्षभरापुर्वी जालिंदरनगरची शाळा करायची होती बंद

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते पाचवी गटातून खेड तालुक्यातील जालिंदरनगर तर इयत्ता पहिली ते आठवी गटातून आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी शाळेना हा पुरस्कार पटकावला आहे.

वारे गुरूजींच्या शाळेला अध्यक्ष चषक! वर्षभरापुर्वी जालिंदरनगरची शाळा करायची होती बंद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आदर्श शिक्षक म्हणून लौकिक असलेल्या दत्तात्रय वारे (Dattatray Ware) यांनी पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. मागील वर्षी शाळा (School) बंद करण्याच्या यादीत असलेल्या पुणे जिल्ह्यातील (Pune ZP) जालिंदरनगर येथील जिल्हा परिषदेच्या (Jalindarnagar ZP School) शाळेचा वारे गुरूंजींनी व शाळेचे मुख्याध्यापक संदीप म्हसुडगे  यांनी कायापालट केला अन् यंदा याच शाळेने उत्कृष्ट शाळांसाठीचा जिल्हा परिषद (Zilla Parishad) अध्यक्ष चषकही पटकावला आहे.

 

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट शाळांसाठी दरवर्षी अध्यक्ष चषक दिला जातो. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते पाचवी गटातून खेड तालुक्यातील जालिंदरनगर तर इयत्ता पहिली ते आठवी गटातून आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी शाळेना हा पुरस्कार पटकावला आहे. विशेष म्हणजे जालिंदरनगर येथील शाळेकडे मागील वर्षीपर्यंत परिसरातील विद्यार्थी पाठ फिरवत होते.

NEP 2020 : सुकाणू समितीत शिक्षण आयुक्तांचाही केला समावेश, काही तासांत बदलला जीआर

वाबळेवाडी येथील शाळेतून दत्तात्रय वारे यांची जालिंदरनगर शाळेत मागील वर्षी बदली करण्यात आली. त्यावेळी शाळेत केवळ आठ ते दहा विद्यार्थी होते. आता या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी परिसरातील इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरणारे पालक प्रयत्न करताना दिसतात. आंतरराष्ट्रीय शाळेला साजेशे उपक्रम या शाळेत सध्या सुरू आहेत. वारे गुरूंजीनी लोकसहभागातून शाळेचा चेहरामोहरा बदला असून त्याची दखल घेत जिल्हा परिषदेनेही अध्यक्ष चषक बहाल केला आहे.

 

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पारितोषिकासाठी दोन गटांतून सात शाळांची निवड केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आणि जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड यांनी ही नावे जाहीर केली. इयत्ता पहिली ते पाचवी गटात जालिंदरनगर शाळेला पहिला क्रमांक मिळाला आहे. तर जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी आणि आंबेगाव येथील एकलहरे शाळेला अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला.

 

इयत्ता पहिली ते आठवी गटात आंबेगाव तालुक्याती गावडेवाडी शाळेने पहिला क्रमांक पटकावला. खेड तालुक्यातील टाकळकररवाडी शाळेला दुसरा क्रमांक मिळाला. वेल्हे तालुक्यातील रांजणे आणि मुळजी तालुक्यातील भोईलवाडी येथील शाळेला संयुक्तपणे तिसरा क्रमांक देण्यात आला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j