शिक्षण,उद्याोग आणि धोरण निश्चितीमध्ये पुण्याचे मोठे योगदान

पुण्यात २५ पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपला शैक्षणिक क्षेत्रात प्रभाव कायम ठेवला आहे,

शिक्षण,उद्याोग आणि धोरण निश्चितीमध्ये पुण्याचे  मोठे योगदान

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशाच्या शिक्षण,उद्याोग आणि धोरण निश्चितीमध्ये पुण्याने मोठे योगदान दिले आहे.पुण्यात २५ पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था असून  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) आपला शैक्षणिक क्षेत्रातील प्रभाव कायम ठेवला आहे,असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी केले .

हेही वाचा : नॅक मूल्यांकनाचे शुल्क कमी होणार ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी नामांकित विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात धर्मेंद्र प्रधान बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अमृत महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील, माजी विद्यार्थी संघाचे संचालक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शा. ब. मुजुमदार, ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. के. एच. संचेती, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे, ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी आणि जेष्ठ साहित्यिक डॉ.अरुणा ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 'माझी माती माझा देश' या उपक्रमात महाराष्ट्राने सक्रिय सहभाग घेवून चांगली कामगिरी बजावली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाटील म्हणाले, सिंबायोसिसचे डॉ. शा. ब. मुजुमदार यांनी त्यांच्या गावी शिक्षणाचे रोपटे लावून शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य केले आहे. कृत्रिम अवयव तयार करून लोकांच्या जीवनात संजीवनी निर्माण करण्यासाठी झटणारे डॉ. के. एच. संचेती आणि पुणे शहरात नृत्य प्रशिक्षणाच्या २५ संस्था स्थापन करणाऱ्या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे यांचेही कार्य उल्लेखनीय आहे. इथेनॉल निर्मितीसाठी कार्य करणारे ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी आणि जेष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे या सर्वच सत्कारमूर्तींनी समाजात आपला ठसा उमटविला आहे.