NEP 2020 : देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी एकच परीक्षा

एनटीए उच्च गुणवत्तेची सामान्य योग्यता चाचणी तसेच विज्ञान मानव्यशास्त्रे, भाषा कला आणि व्यावसायिक विषयांमधील विशेषीकृत सामान्य विषय परीक्षा घेण्याचे काम करेल.

NEP 2020 : देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी एकच परीक्षा
Entrance Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय विद्यापीठांसह सार्वजनिक व खासगी विद्यापीठांमधील (Universities) विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी शेकडो प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक ताणही सहन करावा लागला. शैक्षणिक यंत्रणांवरील बोजाही वाढतो. यापार्श्वभूमीवर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एक प्रवेश परीक्षा सुचविण्यात आली आहे. ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) घेईल. मात्र, ही परीक्षेनुसार प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांवर सोपविण्यात आला आहे.

शैक्षणिक धोरणाच्या आरखड्यानुसार, विद्यापीठ प्रवेश परीक्षांची तत्वे एकसारखी असतील. एनटीए उच्च गुणवत्तेची सामान्य योग्यता चाचणी तसेच विज्ञान मानव्यशास्त्रे, भाषा कला आणि व्यावसायिक विषयांमधील विशेषीकृत सामान्य विषय परीक्षा घेण्याचे काम करेल. या परीक्षांमध्ये संकल्पनांची समज आणि ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता तपासली जाईल आणि या परीक्षांसाठी कोचिंग घेण्याची गरज दूर करणे हे उद्दिष्ट असेल.

हेही वाचा : रिलायन्स फाऊंडेशनकडून पाच हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची घोषणा

विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी विषयांची निवड करू शकतील. प्रत्येक विद्यापीठ प्रत्येक विद्यार्थ्याचा वैयक्तिक विषयांचा पोर्टपोलिओ पाहू शकेल आणि वैयक्तिक आवडी व प्रतिभा यांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देऊ शकेल. उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवीपूर्व व पदवी अभ्यासक्रमांसाटी आणि फेलोशिपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए एक सर्वोच्च, तज्ज्ञ, स्वायत्त चाचणी संस्था म्हणून काम करेल, असे धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.

एनटीए चाचणी सेवांची उच्च गुणवत्ता, श्रेणी आणि लवचिकता बऱ्याच विद्यापीठांना या सामान्य प्रवेश परीक्षा वापरण्यास सक्षण करेल. शेकडो विद्यापीठांनी स्वत:च्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेण्याऐवजी, या एका परीक्षेमुळे विद्यार्थी, विद्यापीठे आणि महाविद्यालयांवरचा तसेच संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल, त्यांच्या प्रवेशासाठी एनटीए मूल्यांकन वापरण्याबाबतचा निर्णय विद्यापीठे आणि महाविद्यालयांवर सोडला जाईल, असेही धोरणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2