वारे गुरूजींनी करून दाखवलं; उजाड माळरानावर उभारली आंतरराष्ट्रीय शाळा

शिरूर (Shirur) तालुक्यातील शिक्रापूर जवळील वाबळेवाडीतील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा बनविणारे हेच ते दत्तात्रय वारे (Dattatray ware) गुरूजी. राज्य सरकारनेच या शाळेला रोल मॉडेल म्हणून स्वीकारले आहे.राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनात या शाळेचे कौतुक झाले.

वारे गुरूजींनी करून दाखवलं; उजाड माळरानावर उभारली आंतरराष्ट्रीय शाळा
Jalindernagar ZP school

राहुल शिंदे 

खेड (khed) तालुक्यातील थिटेवाडी (Thitewadi) धरणाच्या कडेला वसलेल्या एका छोट्याशा जालिंदरनगर वस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांना आपली शाळा वाबळेवाडीसारखी (Wabalewadi School) आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी, असे वाटते आणि अचानक या शाळेत (School) एक गुरुजी बदली होऊन रुजू होतात. मग काय, ग्रामस्थांचा उत्साह वाढतो आणि पाहता-पाहता अवघ्या सात महिन्यांत शाळेची चकाकणारी काचेची देखणी इमारत उभी राहते. अवघ्या आठ - दहा मुलांपर्यत घसरलेला हजेरीपट १५०  पर्यंत जातो. ही एखादी गोष्ट किंवा काल्पनिक घटना नाही, तर असा चमत्कार पुन्हा एकदा ‘वारे' गुरुजींनी (Ware Guruji) करून दाखवला आहे. 

शिरूर (Shirur) तालुक्यातील शिक्रापूर जवळील वाबळेवाडीतील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा बनविणारे हेच ते दत्तात्रय वारे (Dattatray ware) गुरूजी. राज्य सरकारनेच या शाळेला रोल मॉडेल म्हणून स्वीकारले आहे.राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनात या शाळेचे कौतुक झाले. महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील व परदेशातील शिक्षक व शिक्षण क्षेत्राविषयी आस्था असणाऱ्यांनी वाबळेवाडी शाळेला भेट दिली.मात्र ही शाळा उभी करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या वारे गुरुजींना काही कारणांमुळे शाळा सोडावी लागली.त्यावर सर्वच क्षेत्रातून टीका झाली. 

विद्यार्थ्यांनो, काही दिवस एकच गणवेश वापरा! सरकारकडून मिळेनात पैसे

"चांगले काम केले तर तुमचा वारे गुरुजी होईल" अशी एक नवीन म्हण शिक्षण क्षेत्रात जणू जन्माला आली आणि त्यावरही चांगलीच चर्चा रंगली. पण हाडाचा शिक्षक कधीही गप्प बसत नाही. तो दिवस-रात्र आपल्या हातून विद्यार्थ्यांचे कल्याण व्हावे, याच विचाराने झपाटून काम करतो. तसेच काहीसे जालिंदरनगरची शाळा उभी करत असताना झाले. वारे गुरुजींनी जालिंदरनगरकरांच्या भरभक्कम लोकसहभागातून व सहकारी शिक्षक संदीप म्हसूडगे यांच्या साथीने पुन्हा एकदा भव्यदिव्य शाळा उभी केली. आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशी, महाराष्ट्रात पुन्हा एकदा रोल मॉडेल ठरेल, अशी शाळा जालिंदरनगर येथे उभी राहिली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

जालिंदरनगरची जुनी शाळा

आठ मुलांवर आलेल्या जालिंदरनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी आता परिसरातील इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरणारे पालक प्रयत्न करताना दिसतात. आंतरराष्ट्रीय शाळेला साजेशे उपक्रम या शाळेत सध्या सुरू आहेत. त्यात एक शिक्षकी शाळा पॅटर्न, तंत्रज्ञान शिक्षण, रोबोटिक्स, एनईपी २०२० अंमलबजावणी, परदेशी भाषा शिक्षण, ॲडव्हान्स मॅथस्, माईंड पॉवर, ऍग्री मीडियम स्कूल, ब्ल्यू झोन किचन अशा अनोख्या उपक्रमांचा समावेश आहे. शाळेची गुणवत्ता व झालेल्या सकारात्मक बदलांमुळे परिसरातील दहा ते पंधरा गावातील विद्यार्थी या शाळेत दाखल झाले आहेत.

शाळेचा पहिला दिवस; कुठे शिव चरित्राची ओळख, तर कुठे ढोल-ताशाच्या गजरात होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

केवळ लोकसहभागातूनच गाव व शाळा यांचे अतिशय घनिष्ठ नाते तयार करता येते. त्याद्वारे सरकारी शिक्षण प्रक्रियेतील सर्वोत्कृष्ट मॉडेल उभे करता येते. या सर्व गोष्टी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शिक्षकांनी अनुभवल्या आहेत. आतापर्यंत बहुतांश सर्व जिल्ह्यातील शिक्षकांनी जालिंदरनगर येथील शाळेला भेट दिली आहे. अतिशय दुर्गम भागातही शून्यातून झेप घेऊन केवळ सहा सात महिन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभे राहू शकते. हे उघड्या डोळ्यांनी या शिक्षकांनी पाहिले आहे.

रुपडं पालटलेली मॉडेल शाळा

शाळेचा पूर्ण कायापालट

गेल्या सात महिन्यात आमच्या शाळेचा पूर्ण कायापालट झाला आहे. शाळेतील एकही विद्यार्थ्यांनी यापूर्वी राज्य पातळीवरील परीक्षेत कामगिरी दाखवली नव्हती. परंतु यंदा तीन विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर लॅब व प्रयोग करण्यासाठी विविध उपकरणे उपलब्ध झाले आहेत.सुट्टीच्या दिवशी सुद्धा विद्यार्थी शाळेतून अभ्यास करतात.कारण त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता वाटत नाही. गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. यापुढेही वारे गुरुजी सांगतील त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

- भानुदास झोडगे, माजी अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद शाळा, जालिंदरनगर       

शाळा लोकसहभागातून उभी             

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी शासनाकडूनच मिळायला हव्यात, असा आग्रह धरणे उचित नाही. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणचं पुढाकार घ्यायला हवा, या गोष्टी वारे गुरुजी यांनी ग्रामस्थांना पटवून दिल्या. त्यानंतर सर्व सुविधांनी संपन्न असलेली जालिंदरनगरची शाळा लोकसहभागातून उभी राहिली. त्यामुळे विद्यार्थी संख्या सुद्धा वाढली आहे. गावातील मुले न सांगता अभ्यास करतात. विद्यार्थी आता राज्यस्तरीय परीक्षांमध्ये यश संपादन करत आहेत.शाळेचा पट वाढला असून इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्याचा आमचा मानस होता. परंतु यंदा ते शक्य झाले नाही.

- अमित गावडे,अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद शाळा, जालिंदरनगर

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo