MPSC चा सुखद धक्का; लिपिक-टंकलेखक पदाच्या निकालाबाबत तीन महत्वाचे निर्णय

लिपिक-टंकलेखक संवर्गातील ७ हजार ३४ पदासाठी परीक्षा झाली. आयोगाने सुरूवातीला जाहीर केल्याप्रमाणे लिपिक-टंकलेखक पदासाठी विभाग प्राधिकारीनिहाय कट ऑफ लावण्यात येणार होता.

MPSC चा सुखद धक्का; लिपिक-टंकलेखक पदाच्या निकालाबाबत तीन महत्वाचे निर्णय
MPSC Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मंगळवारी (दि. १२ सप्टेंबर) महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२३ मधील लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदाचा निकाल जाहीर केला. जवळपास चार महिन्यानंतर निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. मात्र, निकाल जाहीर करताना आयोगाने विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यामध्ये तीन महत्वाचे व अविश्वसनीय निर्णय घेण्यात आले आहेत. (MPSC Result)

 

संयुक्त गट-ब आणि गट-क संवर्गातील ८ हजार १६९ विविध पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी लिपिक-टंकलेखक संवर्गातील ७ हजार ३४ पदासाठी परीक्षा झाली. आयोगाने सुरूवातीला जाहीर केल्याप्रमाणे लिपिक-टंकलेखक पदासाठी विभाग प्राधिकारीनिहाय कट ऑफ लावण्यात येणार होता. एकूण २४ शासकीय विभागांची पदे असून २८० पोट विभाग/प्राधिकरण आहेत. उमेदवार अर्ज करताना या २८० प्राधिकरणांपैकी किमान एक किंवा सर्व २८० प्राधिकरण विकल्प म्हणून सिलेक्ट करू शकतात. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी लागणारा कट ऑफ कमालीचा वाढेल व हजारो विद्यार्थाच्या मुख्य परीक्षा देण्याच्या संधी नाहकपणे हिरावल्या जातील, अशी भीती व्यक्त स्पर्धा परीक्षा समन्वय समितीसह अनेक विद्यार्थी संघटना, आमदारांनीही व्यक्त केली होती.

शाळेतील असुविधांमुळे संतापलेल्या विद्यार्थिनींनी फोडली शिक्षणाधिकाऱ्याची गाडी

 

परीक्षेचा एकच कट ऑफ लावण्यात यावा, अशी मागणी होत होती. राज्यस्तरीय कट ऑफ लावल्यास, ७,०३४ लिपिक पदांच्या मुख्य परीक्षेसाठी १२ च्या गुणोत्तराने अंदाजे ८४,४०८ विद्यार्थी पात्र होतील, असे समन्वय समितीने म्हटले होते. या मागणीसाठी आयोगावर चांगलाच दबाव वाढला होता. अखेर आयोगाने या मागण्या करताना महत्वाचे निर्णय घेत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

 

निकाल जाहीर करताना आयोगाकडून राज्यस्तरावर एकच कटऑफ लावला आहे. तसेच बारा पटीत ८४ हजार ४०८ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील, असे अपेक्षित होते. मात्र, आयोगाने ९५ हजार ५४७ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र ठरविले आहे. आयोगाने लावलेल्या निकालात पहिल्यांदाच कटऑफ १९ गुणांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. त्यामुळेच अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यापुर्वीचा खुल्या गटासाठीचा कटऑफ ४० च्या पुढे होता, असे विद्यार्थ्यांकडून सांगितले जात आहे. हे तीन निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा देणारे ठरले आहेत.

 

आयोगाच्या या निर्णयाला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहूल कवठेकर यांनी अविश्वसनीय म्हटले आहे. MPSC आयोगाकडे लिपिक पदे वर्ग करण्यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मोठी चळवळ उभी केली होती, त्यामुळेच लिपिक पदे आयोगाकडे जाऊ शकली. तर लिपिक पदांचे राज्यस्तरीय एकच कट ऑफ लावण्यासाठी आयोगाकडे सर्वात पाहिले निवेदन समन्वय समितीने दिले होते. वेळोवेळी आम्ही याचा पाठपुरावा करत होतो तसेच आमच्यासोबत इतर अनेकांनी सुध्दा एक कट ऑफ लागण्यासाठी प्रयत्न केले होते. फक्त १९ कट ऑफ लागल्याने बहुतांश उमेदवार मुख्यसाठी पात्र झाले आहेत, अनेकांसाठी आशेचा हा नवा किरण असेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j