शिक्षक भरती : शिफारसपात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करणार 

संगणकीय प्रणालीच्या परीक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

शिक्षक भरती : शिफारसपात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या (pavitra Portal)माध्यमातून राबविली जात असलेले शिक्षक भरती (Teacher Recruitment) प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या पदभरती प्रक्रियेबाबतच्या कोणताही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे.तसेच संगणकीय प्रणालीच्या परीक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर (General quality list announced)करण्यात येणार आहे, असे शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या न्यूज बुलेटीनद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 

शिक्षक भरती बाबत उमेदवारांची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या व्यक्तींबाबत पोलिसांकडे किंवा शिक्षण विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे यापूर्वीच करण्यात आले आहे. पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेली  शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार केली जात आहे. या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून 14 फेब्रुवारीपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहेत. याच उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.

शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयांचे गट, माध्यम, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण,  विषय इत्यादी बाबींचे संगणकीय प्रणालीतून परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल, असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.