'कमवा व शिका' मानधन वाढीसाठी अधिसभा सदस्याचे उपोषण; व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयाकडे लक्ष

कमवा व शिका योजनेच्या मानधनात ४५ रुपयांवरून ६० रूपये वाढ करण्याचा प्रस्ताव मार्च महिन्यात झालेल्या अधिसभेच्या बैठकीत मांडला होता. त्यास सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली होती. मात्र, अजूनही मानधन वाढीच्या अंमलबजावणीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

'कमवा व शिका' मानधन वाढीसाठी अधिसभा सदस्याचे उपोषण; व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयाकडे लक्ष

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University)संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेअंतर्गत (Earn and Learn Scheme) ६० रुपये प्रति तास मानधन वाढ द्यावी, या प्रस्तावास आधिसभेने (C-NET) मंजुरी दिली. मात्र, त्यास सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे विद्यापीठाचे आधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर (C-NET Member Dadabhau Shinlkar ) यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या (University Management Council) बैठकीत मानधन वाढीचा निर्णय घेतला जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थी कमवा व शिका योजनेचा लाभ घेतात. परंतु,महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरीही अद्याप विद्यापीठाने महाविद्यालयात कमवा व शिका योजना राबवण्यास मंजुरीच दिली नाही. या पूर्वीच्या दोन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकांमध्ये केवळ प्र-कुलगुरू नियुक्ती व इतर प्रशासकीय बाबींवरच चर्चा होत राहिली. त्यामुळे विद्यार्थ्यांची निगडित असणाऱ्या प्रश्नांबाबत निर्णय होऊ शकले नाहीत. मागील व्यवस्थापन परिषदेची बैठक स्थगित केल्यानंतर पुढील पाच दिवसानंतरच बैठक आयोजित केले जाणार होती. परंतु , तसेही होऊ शकले नाही.

हेही वाचा : शिक्षण विद्यार्थ्यांचे डोळे 'कमवा व शिका' योजनेच्या मंजुरीकडे; विद्यापीठाच्या मंजूरीला एक महिना विलंब


      वाढत्या महागाईचा विचार करता विद्यार्थ्यांच्या कमवा व शिका योजनेच्या मानधनात ४५ रुपयांवरून ६० रूपये वाढ करण्याचा प्रस्ताव आधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी मार्च महिन्यात झालेल्या अधिसभेच्या बैठकीत मांडला होता. त्यास सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली होती. मात्र, अजूनही मानधन वाढीच्या अंमलबजावणीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढीव मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
   ---------------------
"विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थी हिताचे निर्णय सहा महिने उलटून गेले तरी होत नसतील तर आम्ही काय करतो, असा प्रश्न आधिसभा सदस्य म्हणून विद्यार्थी आम्हाला विचारणार आहेत. त्यामुळे याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंशी मी चर्चा करणार आहे. तसेच येत्या आठवड्याभरात कमवा व शिका योजनेच्या मानधन वाढीचा निर्णय झाला नाही तर मी विद्यापीठासमोर उपोषण करणार आहे."

- दादाभाऊ शिनलकर, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

----------------------

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j