SPPU NEWS: विद्यापीठातील मुलांच्या मेसच्या जेवनात अळी

यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या जेवनात अळी निघाल्याची घटना घडली होती. त्यामुळे रिफ्लेक्ट्री चालकाचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अळी निघाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

SPPU NEWS: विद्यापीठातील मुलांच्या मेसच्या जेवनात अळी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक ८ मधील मुलांच्या मेसच्या जेवणात अळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच संबंधित मेसचे कंत्राट रद्द करावे,अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

विद्यापीठातील वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेसची सुविधा उपलब्ध असली तरी अनेक वेळा मेसेजच्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी निघाल्याची घटना घडली होती. त्यामुळे रिफ्लेक्ट्री चालकाचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अळी निघाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

विद्यापीठातील विद्यार्थी तुकाराम जाधव म्हणाला, वसतीगृह क्रमांक आठ व नऊ या दोन्ही ठिकाणी एकाच कंत्राटदाराकडून मुलांना जेवण दिले जाते. गुरुवारी सायंकाळी वसतिगृह क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी निघाली. वसतिगृह आठ मध्ये तयार केलेले जेवण वसतिगृह क्रमांक 9 मधील विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी सापडली. याबाबत मेसेज चालकाला विचारले असता, तांदळाचा नवीन कट्टा खराब निघाला. पुन्हा असे होणार नाही, मी तांदूळ बदलून टाकतो, असे त्याने विद्यार्थ्यांना सांगितले.

विद्यापीठात उपहारगृहांची संख्या कमी आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थी नाईलाज म्हणून वसतीगृहातील मेस मध्ये जेवण करतात. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जेवणासाठीचे विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.