लोको पायलट भरतीच्या जागा तिप्पट वाढवल्या; कांचनजंगा ट्रेन दुर्घटनेनंतर रेल्वेचा मोठा निर्णय

बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना एका आठवड्यात चालक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे ओव्हर ड्युटी करणाऱ्या चालकांवरील ताण आणि चालकांच्या चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा रेल्वे बोर्डाचा प्रयत्न आहे.  

लोको पायलट भरतीच्या जागा तिप्पट वाढवल्या; कांचनजंगा ट्रेन दुर्घटनेनंतर रेल्वेचा मोठा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपुर्वी घडलेल्या पश्चिम बंगालमधील कंचनजंगा ट्रेन दुर्घटनेनंतर (Kanchenjunga train accident in West Bengal) रेल्वे प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. रेल्वे बोर्डाने काढलेल्या विविध 5 हजार 696 पदांसाठीच्या रिक्त जागांमध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आहे. बोर्डाने आता एकुण 18 हजार 799 सहाय्यक लोको पायलटच्या भरतीचे (18 thousand 799 Assistant Loco Pilot Recruitment) निर्देश तात्काळ लागू केले आहेत. बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना एका आठवड्यात चालक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे ओव्हर ड्युटी करणाऱ्या चालकांवरील ताण आणि चालकांच्या चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे (Accidents due to driver errors) प्रमाण कमी करण्याचा रेल्वे बोर्डाचा प्रयत्न आहे.  

यापुर्वी 15 डिसेंबर 2023 रोजी 5 हजार 696 असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सर्व विभागीय रेल्वे बोर्डामधून एएलपीची अतिरिक्त भरती करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचा आढावा घेतल्यानंतर, भारतीय रेल्वे बोर्डाने आता १८ हजार ७९९ एएलपींची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे भरती बोर्डाचे संचालक (आस्थापन) विद्याधर शर्मा, यांनी हे आदेश प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे ही इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी प्राप्त झाली आहे. 

इंडियन रेल्वे रिक्रूटमेंट मॅनेजमेंट सिस्टम (OIRMS) रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड, बंगलोरच्या मदतीने ALP ची भरती प्रक्रिया एका आठवड्यात पूर्ण करेल. रेल्वेत दीर्घ काळापासून चालकांची पदे रिक्त आहेत, याची नोंद घ्यावी. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे बोर्डाने नऊ तास ट्रेन चालवण्याची चालकांची ड्युटी निश्चित केली आहे. परंतु, टंचाईमुळे 31 टक्क्यांहून अधिक चालकांना 10-12 तास गाड्या चालवाव्या लागतात. यामध्ये आठ टक्के चालक 12 ते 16 तासांपेक्षा जास्त वेळ गाड्या चालवत आहेत, असे त्यात म्हटले आहे. 

आर्थिक वर्ष 2021-22 साठी रेल्वे बोर्डाच्या सेफ्टी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम (SIMS) नुसार, भारतीय रेल्वेमधील 68.1 टक्के रेल्वे चालकांनी नऊ तास गाड्या चालवल्या आहेत. 17.2 टक्के चालकांनी नऊ ते 11 तास, 6.2 टक्के चालकांनी 11 ते 12 तास आणि आठ टक्के चालकांनी 12 तासांपेक्षा जास्त गाड्या चालवल्या.चालकाला 16 ते 18 तास किंवा त्याहून अधिक काळ काम करावे लागेल. हा सर्व ताण कमी करण्यासाठी पदांसाठी संख्या वाढवण्यात आली आहे.