Balbharati News : पाच महिन्यांपूर्वीच झाले हॅकिंग, बालभारतीच्या तक्रारीतून धक्कादायक माहिती समोर

बालभारतीचे balbharati.in हे संकेतस्थळ असून त्यातच नावाने डोमेन आहे. त्याची २००५ मध्येच नोंदणी केलेली आहे.

Balbharati News : पाच महिन्यांपूर्वीच झाले हॅकिंग, बालभारतीच्या तक्रारीतून धक्कादायक माहिती समोर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ अर्थात बालभारतीचे (Balbharati) डोमेन २ हजार डॉलरला विकणे असल्याची जाहिरात गुगलवर (Google) झळकत आहे. ‘एज्युवार्ता’ने सर्वप्रथम ही बातमी दिल्यानंतर शिक्षण विभागातील (Education Department) अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली. त्यानंतर पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून त्यातून धक्कादयक माहिती समोर आली आहे. पाच महिन्यांपूर्वीच ‘Admin User’ हॅक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (balbharati.in for Sale)

बालभारतीच्या तांत्रिक विभागाचे अधिकारी योगेश लिमये यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. बालभारतीचे balbharati.in हे संकेतस्थळ असून त्यातच नावाने डोमेन आहे. त्याची २००५ मध्येच नोंदणी केलेली आहे. बालभारतीकडून रिसेलर क्लबकडून डोमेनचे नियमितपणे ऑनलाईन नुतणीकरण केले जाते. नुकतेच १६ फेब्रुवारी रोजी पाच वर्षांसाठी नुतणीकरण केल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

'balbharati.in’ विकणे आहे! शिक्षण विभागाचा सावळागोंधळ, ‘डोमेन’ विक्रीची जाहिरात

अचानक १३ जुलै २०२३ रोजी बालभारतीचे डोमेन नेमचिप.कॉम या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेचच याबाबत खुलाशासाठी या संकेतस्थळाकडे खुलासा मागण्यात आला. त्यांनी रिसेलर क्लबकडून माहिती घेण्यास सांगितल्यानंतर हे डोमेन २१ फेब्रुवारी २०२३ रोजीच शिफ्ट झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी पब्लिक डोमेन रजिस्ट्रीकडे तक्रार करण्यास सांगितले. तिथून त्यांनी edp_manager@balbharati.in याद्वारे नुतणीकरणासाठी प्रय़त्न झाल्याचे सांगितले. पण बालभारतीकडून याचा कधीच वापर केला जात नाही. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये ‘Admin User’ हॅक झाल्याची तक्रार असल्याचे लिमये यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, बालभारतीचे डोमेन शिफ्ट झाले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. या संदर्भातील चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येईल जर कोणी मुद्दाम हा प्रकार केला असेल तर संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दिली जाणार असल्याचे बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

"बालभारतीने यासंदर्भातील तांत्रिक अहवाल मागवला आहे. कोणीतरी यात खोडसाळपणा केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल," असे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी मंगळवारी सांगितले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD