'balbharati.in’ विकणे आहे! शिक्षण विभागाचा सावळागोंधळ, ‘डोमेन’ विक्रीची जाहिरात

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ अर्थात बालभारती या राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण संस्थेच्या संकेत स्थळाचे डोमेन (balbharati.in) दोन हजार युएस डॉलर किंमतीला विकणे आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

'balbharati.in’ विकणे आहे! शिक्षण विभागाचा सावळागोंधळ, ‘डोमेन’ विक्रीची जाहिरात
Balbharati News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Balbharati News : 'बालभारतीचे डोमेन विकणे आहे', होय! अशा स्वरूपाची जाहिरात गुगलवर (Google) प्रसिध्द झाल्याने शिक्षण विभाग (Education Department) गोंधळून गेला आहे. बालभारतीने यासंदर्भातील तक्रार नोंदवली असल्याचे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी सांगितले आहे. तसेच याबाबतचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येईल, असे बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ('Balbharati.in' is for sale)

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ अर्थात बालभारती या राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण संस्थेच्या संकेत स्थळाचे डोमेन (balbharati.in) दोन हजार युएस डॉलर किंमतीला विकणे आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ebalbharati.in या संकेतस्थळावर बालभारतीची पाठ्यपुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील कोट्यावधी विद्यार्थी या संकेतस्थळाला भेट देऊन पुस्तकांची पीडीएफ फाईल ओपन करून पाहू शकतात. बालभारतीच्या संकेतस्थळावर महत्त्वाची माहिती साठवून ठेवलेली आहे. त्यामुळे संकेतस्थळामध्ये छेडछाड होऊ नये, याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

धक्कादायक : शिक्षणाधिकाऱ्याची बनावट सही करून शाळेने मिळवली बोर्डाची मान्यता

बालभारतीचे डोमेन शिफ्ट झाले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. बालभारती कडून रिटेल क्लब या कंपनीच्या माध्यमातून तांत्रिक बाबींची पूर्तता केली जाते. गेल्या फेब्रुवारी महिन्यातच पाच वर्षासाठी डोमेनचे शुल्क भरले आहे, असे असताना हा प्रकार कसा घडला याबाबत बालभारतीच्या अधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या संदर्भातील चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येईल जर कोणी मुद्दाम हा प्रकार केला असेल तर संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दिली जाणार असल्याचे बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डोमेनचे नुतणीकरण केले नाही?

गुगल वर कोणतीही माहिती शोधण्यासाठी प्रथमतः संबंधित संकेतस्थळाचे नाव टाकावे लागते. त्यालाच 'डोमेन' असे म्हणतात. balbharati.in हे डोमेनचे नाव आहे. हे नाव ऑनलाइन विकत घेऊन त्याचे शुल्क दरवर्षी किंवा एकदाच काही वर्षांसाठी भरावे लागते. एकदा विकत घेतलेले डोमेन दुसऱ्याला घेता येत नाही. तसेच डोमेनची मुदत संपण्यापूर्वी पुन्हा त्याचे नूतनीकरण करावे लागते. परंतु, बालभारतीचे डोमेन विकणे आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध झाली. ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधितांकडे तक्रार केली आहे. बालभारतीने डोमेन नूतनीकरणाचे काम ज्या कंपनीकडे दिले आहे, त्यांनी हे काम नीटपणे केले आहे की नाही, हे तपासावे लागणार आहे.

-----

"बालभारतीने यासंदर्भातील तांत्रिक अहवाल मागवला आहे. कोणीतरी यात खोडसाळपणा केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल."

 - कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD